Prachi Rathod Ruth Johnpaul Transgender Doctors : तेलंगणातील ( Telangana) दोन तृतीयपंथीयांनी सर्व आव्हानांना तोंड देत त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि राज्यातील सरकारी सेवेत सामील होणारे पहिले ट्रान्सजेंडर डॉक्टर बनून इतिहास रचला आहे. प्राची राठोड आणि रुथ जॉनपॉल अशी दोन्ही ट्रान्सजेंडर डॉक्टरांची नावे आहेत. या दोन्ही डॉक्टरांनी नुकताच शासकीय उस्मानिया सामान्य रुग्णालयात ( OGH - Osmania General Hospital ) वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. प्राची राठोड हिला तृतीयपंथी असल्यामुळे शहरातील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नोकरीवरून काढून टाकलं होतं.


प्राची राठोडने 2015 मध्ये आदिलाबादच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केलं. पीटीआयशी बोलतान त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, लहानपणापासून सामाजिक कलंक आणि भेदभाव याचा दृष्टीने लोक आमच्याकडे पाहायचे. मी डॉक्टर झाल्यानंतरही अनेक लोकांनी भेदभाव केला. प्राची राठोड पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीला गेली होती, पण प्रतिकूल परिस्थितीमुळे तिलान पुन्हा हैदराबादला परतावं लागलं.






हैदराबाद येथील रुग्णालयात कार्यरत असताना प्राचीने इमर्जन्सी मेडिसिनचा डिप्लोमा केला. शहरातील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन वर्षे काम केलं. पण प्राची तृतीयपंथी असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होऊ शकते असं हॉस्पिटलला वाटलं. त्यामुळे प्राचीला रुग्णालयातून काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर एक गैर-सरकारी संस्था (NGO) त्यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि प्राचीला या NGO च्या क्लिनिकमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर आता प्राचीला स्मानिया सामान्य रुग्णालयात (OGH) नोकरी मिळाली.


प्राचीचं लहानपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, पण इतर विद्यार्थ्यांच्या टोमण्यांवर मात करत 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. प्राचीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'ती खरंच खूप वाईट वेळ होती. डॉक्टर होण्याचा विचार करण्याऐवजी आयुष्य कसे जगायचे आणि या गोष्टींवर मात कशी करायची हा मोठा प्रश्न होता.' तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणींचा संदर्भ देत तिने पुढे सांगितलं की, 'नोकरी आणि शिक्षणात काही आरक्षण दिल्यास या समाजाला जीवनात पुढे जाण्यास मदत होईल.'