Belgaum news : उद्यम बाग येथील तिसऱ्या रेल्वे गेटवर उभारण्यात आलेला रेल्वे ओव्हर ब्रीजवरून उद्धाटन झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्येच खड्डे पडल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुट्टीत नोटा घालून आंदोलन करत निकृष्ठ कामाचा निषेध केला. उद्घाटन केल्यानंतर केवळ 24 तासांच्या आतच रेल्वे ओव्हर ब्रिजवर खड्डा पडल्याने काँग्रेसने बुट्टीत नोटा भरून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुट्टीत नोटा घालून रेल्वे ओव्हर ब्रिजवर मोर्चा काढला. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.
पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांनी यावेळी केला. 40 टक्के कमिशन घेणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणाही मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या. खड्डा पडलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बुट्टीतील नोटा ओतून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध केला. 24 तासांमध्येच ब्रिजवर खड्डा पडल्याने कामाच्या दर्जाबाबत जनतेमधूनही सवाल विचारण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांत याबाबत वृत्त आल्यावर तो खड्डा मुजवण्यात आला. रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुलावर 35 कोटींचा खर्च
दरम्यान, या पुलावर 35 कोटींचा खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असतानाही उद्घाटन करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुलाची कामे बाकी असतानाच उद्घाटन झाल्याने वाहतूक सुरु झाल्यानंतर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही रस्ता ठिकाणी खचल्याचेही दिसून आले.
इतर महत्वाच्या बातम्या