मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करण्यासाठी टीटीई म्हणजेच टीसींच्या हातामध्ये पीओएस मशीन सोपवलं जाणार आहे. अनेकदा विनातिकीट प्रवास करताना प्रवासी पकडले जातात, मात्र त्यांच्याकडे कॅश नसल्यास त्यांना सोडून दिलं जातं किंवा पोलिसांच्या हवाली केलं जातं. मात्र आता क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून दंडाची रक्कम वसूल करणं सोपं होणार आहे.


ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर अर्थातच टीटीईंना लवकरच पीओएस मशीन दिलं जाणार आहे. नुकताच रेल्वे बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येत्या 15 जानेवारीपर्यंत सर्व टीसींच्या हातात पीओएस मशीन देण्यासाठी रेल्वे बोर्डाने आराखडाही बनवला आहे. पीओएस मशीनसह टीटीईला टॅबही देण्यात येणार आहे.

टीटीईंना टॅब आणि पीओएस मशीन दिल्यामुळे रिव्हेन्यूतील घट कमी होण्यास मदत होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रेल्वेच्या टीसींवर अवैध दंडवसुलीचा आरोप केला जातो, या नव्या निर्णयामुळे त्यालाही आळा बसणार आहे.

पीओएस मशीन कसं काम करेल?

टीटीईंना पीओएस मशीन दिल्यामुळे व्यवहार पारदर्शक आणि कॅशलेस होतील असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अनेकदा रिकामी बर्थ राहिल्यास टीटीई गरजू प्रवाशांना हे बर्थ उपलब्ध करुन देतात आणि त्याची रक्कम वसूल करतात. या व्यवहारासाठी पीओएस मशीनचा वापर केला जाईल. तसंच अन्य कोणत्याही स्वरुपाचा दंड किंवा आरक्षण शुल्क या पीओएस मशीनद्वारे भरता येणार आहे.

पेपरलेस कामकाजासाठी टॅब

रेल्वे बोर्डाने टीटीईंना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण लवकरच चार्ट प्रिंटिंगची सीस्टिम बंद केली जाण्याची शक्यता आहे. टॅब दिल्यानंतर टीटीईंच्या हातात मोठा चार्ट देण्याची गरज उरणार नाही, तसंच डब्यांच्या बाहेरील चार्टही बंद केला जाऊ शकतो. स्टेशन्सवर डिस्प्ले बोर्डवर इलेक्ट्रॉनिक फीडिंगच्या माध्यमातून पीएनआरची माहिती दिली जाणार आहे. टीटीईच्या हातातील टॅबमध्ये प्रवाशांची सर्व माहिती आणि रिझर्वेशन चार्ट लोड केलेला असेल. याच टॅबच्या माध्यमातून टीटीईंना आपला हिशेबही द्यावा लागणार आहे.