Pooja Khedkar: राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरलेली आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकरचे (Pooja Khedkar) पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. पूजा खेडकरला (Pooja Khedkar) डीओपीटीने मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यासाठी दिलेली मुदत काल (शुक्रवारी) संपली आहे. त्यामुळे आता यापुढे पूजा खेडकरला तिची बाजू मांडण्याची संधी यूपीएससीकडून दिली जाणार नाही. तशी नोटीस काल (शुक्रवारी) संध्याकाळी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या बंगल्याच्या गेटवर आणि अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव इथल्या घराच्या दरवाज्यावर डीओपीटीकडून चिकटवण्यात आली होती.


मात्र खेडकरांच्या (Pooja Khedkar) बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तींनी ही नोटीस काढून टाकल्याची माहिती आहे. या आधी देखील पुणे पोलिसांनी खेडकर (Pooja Khedkar) कुटुंबाला वेळोवेळी नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खेडकर कुटुंबाने त्या स्वीकारल्या नाहीत आणि बंगल्याच्या गेटवर त्या चिकटवल्यानंतर त्या काढून टाकल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरवर गुन्हा दाखल केला असून 22 ऑगस्ट पर्यंत तिला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. मात्र, आता यापुढे पूजा खेडकरचे यूपीएससीसमोर बाजू मांडण्याचे मार्ग बंद झाले आहे. त्यानंतर यूपीएससीकडून पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) पुढची कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


नेमकं प्रकरण काय?


पूजा दिलीप खेडकर (Pooja Khedkar) 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात तिची नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं तिच्याबाबत प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर तिथून वाशिम इथं बदली करण्यात आली होती. पूजा खेडकरने (Pooja Khedkar) दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले. 


याच आधारावर तिला विशेष सवलत मिळाली आणि ती आयएएस झाली. त्यानंतर तिला सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिली. तसेच पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) स्वतःच्या नावात, तिच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.