पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मोठा वाटा असलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश करत प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
त्यामुळे प्रशांत किशोर येत्या काळात जेडीयूमध्ये आणि बिहार सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतील. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना नंबर दोनचं पद देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे.
प्रशांत किशोर पक्ष आणि सरकार यांच्यात मध्यस्थीचं काम करणार आहेत. याशिवाय येत्या काळात प्रशांत किशोर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा आहेत. प्रशांत किशोर यांना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे निकटवर्तीय मानलं जातं.
मात्र त्यांच्या जेडीयूतून प्रत्यक्ष राजकीय सुरुवातीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रशांत किशोर यांच्या जेडीयू प्रवेशानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये खळबळ माजली आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्वीट करत जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.
जेडीयूमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयानंतर प्रशांत किशोर यांनी म्हटलं की, "जेडीयूचा प्रस्ताव मला गेल्या अनेक दिवसांपासून होता, मात्र आता ही योग्य वेळ आहे. सरकारमध्ये असो वा पक्षात, नितीश कुमार जी जबाबदारी सोपवतील ती मी योग्यरित्या पार पाडेल."
काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीने लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे केला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 48 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 11 टक्के लोकांनी पसंती दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.
प्रशांत किशोर यांची कारकीर्द
निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे.
प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या.
बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता.
यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते.