राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2017 10:53 AM (IST)
हनीप्रीत कायमच राम रहीमसोबत दिसायची. बाबा राम रहीमला दोषी ठरवलं, त्यादिवशीही हनीप्रीत त्याच्यासोबत होती. परंतु बाबाला कैद केल्यापासून ती बेपत्ता झाली आहे.
चंदीगड : बलात्कारी बाबा राम रहीमची निकटवर्तीय आणि दत्तक मुलगी हनीप्रीत इन्साविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. राम रहीमची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर हनीप्रीत फरार आहे. लूकआऊट नोटीस जारी झाल्यानंतर आता हनीप्रीत देश सोडून जाऊ शकत नाही. पोलिस मागील काही दिवसांपासून हनीप्रीतचा शोध घेत आहेत. राम रहीमला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर हिंसा भडकवल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पोलिस ठिकठिकाणी छापा टाकत आहे. पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्साविरुद्धही लूकआऊट नोटीस जारी केली आहे. हे लोक राम रहीमचे निकटवर्तीय समजले जातात. राम रहीमला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हनीप्रीतने षडयंत्र रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हनीप्रीत राजस्थानमध्ये राम रहीमच्या मूळगावी लपल्याचं म्हटलं जात आहे. हनीप्रीत कायमच राम रहीमसोबत दिसायची. बाबा राम रहीमला दोषी ठरवलं, त्यादिवशीही हनीप्रीत त्याच्यासोबत होती. परंतु बाबाला कैद केल्यापासून ती बेपत्ता झाली आहे. हनीप्रीत ना रोहतकमध्ये आहे, ना सिरसामधील राम रहीमच्या डेरामध्ये. कोर्टात सादर करताना राम रहीमला पळवण्याच्या कटाप्रकरणी हरियाणा पोलिसांच्या पाच कर्मचाऱ्यांचं निलंबन करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन खासगी कमांडोही पोलिसांच्या ताब्यात आहेच. पण कट रचणारी आठवी व्यक्ती हनीप्रीत अजूनही गायब आहे. काही वृत्तानुसार, हनीप्रीतही राजस्थानच्या गुरुसर मोडियामधील गावात दाखल झाली आहे. परंतु कुटुंब किंवा राम रहीमशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची कोणालाही परवानगी नाही.