लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पोलिसांनी संशयित समजून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. या तरुणाच्या डोक्यात गोळी लागूनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. जवळून गोळी मारल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.


उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यूपीची राजधानी लखनौमधील गोमती नगर परिसरात पोलिसांनी संशयित समजून एका युवकावरच गोळी झाडल्याचं समोर आलं आहे. शवविच्छेदन अहवालानंतर आता हत्येचा गुन्हा दाखल केला जात असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

यूपी पोलिसांची पत्रकार परिषद

ज्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा या गोळीबारामध्ये समावेश होता, त्यांच्यावर भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांना अटकही करण्यात आली आहे. ही परिस्थिती टाळली जाऊ शकत होती. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती यूपी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

पोलिसांचं म्हणणं काय?

या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री बारा वाजता मृत्यू झाला. “कार चालवणारा हा तरुण संशयित वाटत होता, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर कार चढवण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर गोळी घातली,” असा दावा पोलिसांनी केला आहे.

“गोमतीनगर परिसरात एक कार उभी असताना समोरुन दोन पोलीस कर्मचारी येत होते. पोलिसांना पाहताच ही कार निघून जात होती. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच गोळी चालल्याचा आवाज आला. अचानक गाडी एका खांबावर आदळली. विवेक त्यानंतर रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू गोळी लागल्याने झाला की गाडी खांबावर आदळल्याने याचा तपास सुरु आहे,” अशी माहिती लखनौचे एसएसपी कलानिधी नैथानी यांनी दिली.

शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट झालं आहे, की विवेकचा मृत्यू हा गोळी लागल्यानेच झाला.

कोण आहे मृत तरुण?

सुलतानपूर इथे राहणारा विवेक हा तरुण अॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर या पदावर काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. याचदरम्यान विवेकची सहकारी सना हिला मीडियाशी बोलू नये यासाठी पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

प्रत्यक्षदर्शी नजरकैदेत

पोलीस कर्मचाऱ्याने गोळी मारल्याची घटनेची विवेकची महिला सहकारी ही प्रत्यक्षदर्शी आहे. तिला पोलिसांनी गोमतीनगरमधील तिच्या घरीच नजरकैदेत ठेवलं आहे, जेणेकरुन तिला मीडियाशी बोलता येणार नाही. गोळीबाराची घटना घडली तेव्हा ती विवेकसोबत कारमध्ये होती.

पत्नीचा सवाल

विवेकच्या पत्नीने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ''विवेकला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं की सोबत असलेल्या महिला सहकाऱ्याला तिच्या घरी सोडून येणार आहे. काही वेळाने फोन केला तर दुसऱ्या एका व्यक्तीने फोन उचलला आणि सांगितलं की अपघात झालाय. रुग्णालयात गेल्यानंतर खरं काय ते सांगितलं नाही. असं सांगण्यात आलं, की डोक्याला मार लागल्यामुळे जास्त रक्तस्राव झाला आणि त्यांना वाचवता आलं नाही,'' अशी माहिती विवेकची पत्नी कल्पनाने दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कल्पना यांनी काही सवाल केले आहेत. “मला योगी आदित्यनाथ यांच्याकडून उत्तर हवंय की पोलिसांनी माझ्या नवऱ्याला का मारलं? ते कोणत्याही परिस्थितीत असतील तरी गोळी का मारली? आरटीओकडून नंबर घेऊन नंतर पत्त्यावर येऊ शकले नसते का? गोळी मारण्याची काय गरज होती,” असा सवाल कल्पना यांनी केला आहे.

जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः घटनास्थळावर येणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार केला जाणार नाही. हा दिवस पाहण्यासाठी आम्ही त्यांना मतदान केलं नव्हतं, असं म्हणत विवेकच्या मेहुण्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालकांशी या प्रकरणी फोनवरुन बातचीत केली आहे. तर उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असं सांगितलं आहे.