नवी दिल्ली : भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. पहिल्याच पत्रकार परिषदेत नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारने आदेश दिले तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ, असं नरवणे यांनी म्हटलं.


जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे आणि केंद्र सरकारने आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग होऊ शकतो. तशी प्रकारची कारवाई आम्ही करु शकतो, असं नरवणे यांनी म्हटलं. सियाचिन भारतासाठी महत्त्वाचा भाग आहे. देशाची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे, असंही लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.


भारतीय सेना आधीच्या तुलनेत आता खुप बलाढ्य झाली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर भारतीय सेनेची करडी नजर असते. पाकिस्तानच्या कुरघोडींवर योग्य ती कारवाई करण्यात भारताला यश येत आहे, अशी माहिती लष्करप्रमुखांनी दिली.


चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ महत्त्वाचं पाऊल


चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे भारतीय सेना आणखी मजबूत होईल. भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्हीमध्ये ताळमेळ असणे गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही भविष्यातील आव्हाने आणि संकटे यावर आणि प्राथमिकतेनुसार अर्थपुरवठ्याची तरतूद यांचं आम्ही योग्य नियोजन करु शकतो, असं लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले.





लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 1 जानेवारी रोजी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते देशाचे 28 वे लष्करप्रमुख आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून चीफ ऑफ डिफेन्स पदी निवड करण्यात आली. जनरल बिपिन रावत यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याजागी मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.