मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेल्या मेहुल चोकसीच्या मालमत्तांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मेहुल चोकसीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्ता ईडीने जप्त केल्या.

या मालमत्तांमध्ये 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधलं ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधलं फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनही जप्त करण्यात आली.

डायमंड किंग नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी पीएनबी बँकेत कर्ज घोटाळा करुन परदेशात पोबारा केला आहे. मात्र सीबीआय आणि ईडीकडून या दोघांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरुच आहे.

दरम्यान, यापूर्वीही ईडीने नीरव मोदीच्या 9 आलिशान कार जप्त केल्या होत्या. ज्यामध्ये एक रोल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज, एक पोर्शे, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हाचा समावेश आहे.

जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यासोबतच ईडीने नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. ज्याची किंमत सध्या 7 कोटी 80 लाख रुपये सांगितली जात आहे.

याचप्रमाणे या घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत.

मामा भाच्याच्या या जोडीने पीएनबीत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे एक रुपयाही कर्ज परत करणार नाही, असं उत्तर नीरव मोदीने बँकेला पत्र लिहून दिलं होतं.