नवी दिल्ली : लोकसभेत काल टीडीपीने आणलेल्या अविश्वास ठरावावर जोरदार भाषणं झाली. मात्र यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाची, त्यांनी केलेल्या आरोपांची आणि त्यांच्या गळाभेटीची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जोरदार फटकेबाजी करत राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर दिलं. शिवाय गळाभेटीवर राहुल गांधींची फिरकीही घेतली.

राफेल डील

राहुल गांधी : “आमच्या यूपीएच्या काळात राफेल डीलमध्ये एका विमानाची किंमत 520 कोटी रुपये ठरली होती. मात्र काय झालं माहित नाही, पंतप्रधान फ्रान्सला गेले, तिथे कुणासोबत गेले पूर्ण देशाला माहित आहे. जादूने एका विमानाची किंमत 1600 कोटी रुपये झाली. संरक्षण मंत्री इथे बसलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की आकडेवारी देऊ शकत नाही, तसा दोन्ही देशातला करार आहे. मात्र मी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना विचारलं तर ते म्हणाले असा कोणताही करार झालेला नाही, माहिती सार्वजनिक केली जाऊ शकते. पंतप्रधानांच्या दबावात येऊन संरक्षण मंत्री खोटं बोलल्या आहेत’’

पंतप्रधान मोदी : “जे लोक एवढे दिवस सत्तेत राहिले, तेच आरडाओरड करुन खोटेपणाला खरं करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेने अशा लोकांना ओळखलेलं आहे. सत्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चुकीची माहिती दिली जात आहे. दोन जबाबदार सरकारच्या मध्ये हा व्यवहार झाला आहे, दोन पक्षांच्या मध्ये नाही. किमान सुरक्षेच्या मुद्द्यावर तरी ही भूमिका घेऊ नका. हा व्यवहार पूर्ण पारदर्शकतेने झालेला आहे.’’

डोकलाम

राहुल गांधी : “पंतप्रधान गुजरातमध्ये नदीच्या किनाऱ्यावर चीनच्या राष्ट्रपतींसोबत झोपाळ्यावर बसले होते. त्यानंतर चीनचे राष्ट्रपती चीनमध्ये गेले आणि हजारो सैनिक डोकलाममध्ये होते. पंतप्रधान चीनला जातात आणि म्हणतात की आपण इथे डोकलामवर बोलणार नाही. हा चीनचा अजेंडा होता’’

पंतप्रधान मोदी : “इथे डोकलामची चर्चा झाली. मला माहितीये की कधी कधी ज्या विषयाची माहिती नसते, त्यावर बोलल्यामुळे आपल्याच अंगाशी येतं. यामुळे व्यक्तीचं नुकसान कमी आणि देशाचं नुकसान जास्त होतं. जेव्ह संपूर्ण देश एकजुटीने डोकलामच्या मुद्द्यावर बोलत होता, तेव्हा हे (राहुल गांधी) चीनच्या राजदुतांसोबत बैठका करत होते. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी तर अगोदर बैठक झालीच नसल्याचं सांगितलं. मात्र नंतर खरं सांगितलं.’’

शेतकरी प्रश्न

राहुल गांधी : “ सरकारमध्ये दलित, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्यांक, युवा आणि महिलांवर अन्याय होत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, पण त्यांनी उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आपल्या उद्योजक मित्रांना फायदा मिळवून दिला आहे’’

पंतप्रधान मोदी :आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यासाठी अनेक पाऊलं उचलली आहेत. देशभरातील 15 कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड दिलं आहे, मात्र विरोधकांना यावर विश्वास नाही. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना युरियाची कमी पडू दिली नाही, मात्र यावरही विरोधकांना विश्वास नाही. जनधन योजनेंतर्गत 32 कोटी खाते उघडण्यात आले आणि उज्ज्वला योजनेंतर्गत 4.5 कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं गेलं’’

रोजगार

राहुल गांधी : “15 लाख रुपये आणि रोजगार देण्याचं आश्वासन हा फक्त जुमला आहे. पंतप्रधान जिथे जातात तिथे रोजगाराचं बोलतात. कधी सांगतात पकोडे बनवा, कधी सांगतात दुकान सुरु करा. रोजगार कोण आणणार? भारतातील तरुणांनी पंतप्रधानांवर विश्वास ठेवला. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सांगितलं प्रत्येत वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार मिळेल’’

पंतप्रधान मोदी : “सरकारच्या सर्व क्षेत्रातील आकडा एकत्र केला तर गेल्या एक वर्षात एक कोटी रोजगार निर्माण झाले आणि त्यामुळेच माझी विनंती आहे की दिशाभूल करण्याचं काम करणं बंद करावं. हे एका स्वतंत्र एजन्सीच्या हवाल्याने मी सांगत आहे, सरकारी आकडेवारी सांगत नाही. यावर विश्वास ठेवा आणि देशात रोजगाराच्या नावावर खोटं पसरवणं बंद करा’’

नजर मिळवू शकत नाही’’

राहुल गांधी : “संपूर्ण देश पाहतोय आणि मी पंतप्रधानांच्या बाबतीत स्पष्टपणे सांगितलं आहे (समोर बसलेल्या मोदींकडे इशारा करत) की ते माझ्या नजरेला नजर मिळवून नाही बोलू शकत. हे वास्तव आहे, की चौकीदार नाही, भागीदार आहेत. देशाला हे समजलं आहे.”

पंतप्रधान मोदी : “एक गरीब आईचा मुलगा, मागासलेल्या जातीचा नरेंद्र मोदी असं कसं करु शकतो? मी नजरेला नजर नाहीच मिळवू शकत. नजरेला नजर मिळवलेल्या सुभाषचंद्र बोस यांचं काय झालं देशाने पाहिलं, चौधरी चरण सिंह यांच्यासोबत काय झालं, जय प्रकाश नारायण यांच्यासोबत काय झालं, मोरारजी देसाई यांच्यासोबत काय झालं, सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यासोबत काय झालं, शरद पवार यांच्यासोबत काय झालं?”

जीएसटी- नोटाबंदी

राहुल गांधी : “जीएसटी ही काँग्रेसची संकल्पना होती आणि त्याला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता. आमचं म्हणणं होतं, की पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत असावं. जे छोट्या-छोट्या दुकानदारांच्या मनात आहे, शेतकऱ्यांच्या मनात आहे, ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचत नाही. जिओच्या जाहिरातीवर पंतप्रधानांचा फोटो येऊ शकतो आणि त्या ताकदींची ते मदत करतात. 10-20 उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी काम करतात. गरीब-मजूरांसाठी यांच्या मनात जागा नाही.”

पंतप्रधान मोदी : जीएसटीचा विषय एवढे दिवस कुणी अडवून धरला होता आणि सांगितलं गेलं, की गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी तो अडवला. मी काय म्हणालो होतो, ते आत्ताही मिळेल. जर काँग्रेसने राज्यांच्या हिताची चिंता केली असती, तर जीएसटी प्रणाली पाच वर्षांपूर्वीच लागू झाली असती. नोटाबंदीनंतरही अनेक राज्यात भाजपने सत्ता मिळवली. त्यामुळेच स्पष्ट होतं, की देशाच्या जनतेने नोटाबंदीली स्वीकारलं आहे.”

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण



VIDEO : राहुल गांधींचं भाषण