PM Narendra Modi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आजपासून (19 मे) 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांना भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी जपानमध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून त्यांचा जपान दौरा 19 ते 21 मे दरम्यान असेल.


या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांची भेट घेणार आहेत. जपानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत, पंतप्रधान मोदी हे इतर सहभागी देशांसोबत G-7 सत्रांमध्ये बोलतील. या सत्रांमध्ये पीएम मोदी शांतता, स्थिरता आणि समृद्धी, अन्न, खत आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता, हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतील, अशी माहिती आहे.


दुसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान 21 मे रोजी पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनी इथे दाखल होतील, जिथे ते पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्यासाठी (FIPIC) तिसऱ्या मंचाचे संयुक्तपणे आयोजन करतील.


तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात, 22 ते 24 मे रोजी सिडनीमध्ये मोदींची ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांच्याशी द्विपक्षीय बैठक असेल. मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसह सिडनीमध्ये हजारो भारतीयांना संबोधित करतील. त्यांचा हा दौरा सांस्कृतिक, व्यवसाय आणि परदेशी भारतीयांशी संबंधित समस्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील महत्त्वाच्या गोष्टी


पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे जपानी पंतप्रधान किशिदा फुमियो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. G-7 शिखर परिषदेव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी मित्र देशांच्या इतर नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.


यादरम्यान क्वॉड संघटनेच्या (क्वॉड) नेत्यांची जपानमध्येच भेट होण्याची शक्यता आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.  


G7 शिखर परिषदेत भारताला अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. G7 संघटनेमध्ये फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, इटली आणि कॅनडा आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे. यापूर्वी, पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी 27 जून रोजी जर्मनीमध्ये G7 शिखर परिषदेत सहभागी झाले होते.


स्वत:ला जगाची नवी महासत्ता मानणाऱ्या चीनचा मुकाबला करण्यासाठी स्थापन झालेल्या क्वॉड संघटनेची बैठकही जपानमध्ये होणार आहे. चीनसोबतचा तणाव वाढल्याने या गटाने आपले सुरक्षा आणि आर्थिक संबंध अधिक तीव्र केले आहेत.


गेल्या वर्षी 24 मे रोजी टोकियो इथे झालेल्या दुसऱ्या क्वॉड लीडर्स समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासोबत फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC III समिट) च्या तिसऱ्या शिखर परिषदेचे संयुक्तपणे यजमानपद भूषवतील.


2014 मध्ये सुरु करण्यात आलेल्या, FIPIC मध्ये भारतासह 14 पॅसिफिक बेट देशांचा समावेश आहे. कूक बेटे, मायक्रोनेशियाची संघराज्ये, फिजी, किरिबाती, नाऊरु, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, मार्शल बेटांचे प्रजासत्ताक, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु ही हे बेटे आहेत.


गव्हर्नर-जनरल सर बॉब डेड आणि पंतप्रधान जेम्स मार्पे यांच्या भेटीसह पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीमध्ये द्विपक्षीय व्यवहार करणार आहेत. पापुआ न्यू गिनीला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल.