नवी दिल्ली : धर्माचा वापर करुन राजकीय उद्देशानं विभाजनाची दरी निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर निशाणा साधला. खालिस्तानच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेणाऱ्या कॅनडा सरकारचे मोदींनी कान टोचले.

ट्रुडो यांनी स्नेहभोजन कार्यक्रमाला दोषी सिद्ध झालेल्या खालिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रित केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ट्रुडो यांच्या भेटीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं.

राजकीय उद्देशासाठी धर्माचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतंही स्थान नाही. देशाच्या एकात्मतेला आव्हान देण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असं मोदींनी स्पष्ट शब्दात सुनावलं.

नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि ट्रुडो यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये सहा करार झाले. कॅनडात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाशी करार केला आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.