नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. यानंतरही लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. त्यामध्ये लॉकडाऊन वाढणार की संपणार याबाबत निर्णय अपेक्षित आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओने या बैठकीच्या आधी म्हणजेच काल (10 एप्रिल) म्हटलं आहे की, "कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लावलेला लॉकडाऊन हटवण्यात घाई केली तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल."


नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहे. या बैठकीत कोरोना व्हायरस आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातच चर्चा केली जाणार आहे. याशिवाय या बैठकीत लॉकडाऊन सुरु राहणार की 14 एप्रिलनंतर संपणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसोबत संबंधित राज्यांमधील कोरोनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतील.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी लॉकडाऊन वाढवावा, असंच म्हटल होतं. त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळत आहे. पंतप्रधान मोदींनीही लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत देत म्हटलं होतं की, "देशातील सध्याची परिस्थिती पाहता एकाएकी लॉकडाऊन उठवणं शक्य नाही."


घाईत लॉकडाऊन हटवल्यास घातक परिणाम
डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनिवामधील पत्रकार परिषदेत म्हटलं की, "लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीही इच्छा आहे. परंतु घाईने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होती. जर आपण योग्य पद्धतीने कोरोना व्हायरसचा सामना केला नाही तर त्याचे घातक परिणाम होतील."