नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. मन की बातमधून मोदींनी महाराष्ट्रातल्या संस्थांचा गौरव केला आहे. तसंच गणेशोत्सवात होणाऱ्या प्रदूषणावर बोट ठेवत देशाला ईको फ्रेन्डली होण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये रिओ ऑलिम्पिकची तयारी, देशातील मुद्दे, गणेशोत्सव या मुद्द्यांवर जनतेला काही आवाहनं देखील केली आहेत.
आज हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून केलेल्या मन की बातमध्ये मोदींनी त्यांच्या कार्याची आठवण करुन द्यावीशी वाटते, मेजर ध्यानचंद खेळातील चैतन्य आणि देशभक्तीतील एक जिवंत उदाहरण होते, असे गौरवोद्गार काढले. तसंच रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला जी काही पदकं मिळाली आहेत ती मुलींनी मिळवून दिली आहेत. मुली कशातही कमी नाहीत हे पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिकने सिद्ध केलं आहे, असंही मोदींनी सांगितलं. शिवाय ललिता बाबरने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे आणि दीपा कर्माकरची कामगिरीही भारावून टाकणारी होती असं मोदी म्हणाले.
मन की बातमधून मोदींनी महाराष्ट्रातील चार संस्थांचा गौरव केला आहे. यात कोल्हापूरातील निसर्गमित्र आणि विज्ञानप्रबोधिनी या संस्थांसोबत अकोल्याची निसर्गकट्टा आणि गिरगावच्या राजाचाही समावेश आहे.