नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मेरठ महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9) आणि इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेचं लोकार्पण करण्यात आलं. मोदींनी रोड शो करुन दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेचं उद्धाटन केलं.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील हा महामार्ग त्यांच्या वाढदिवशीच प्रत्यक्षात उतरला आहे.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या दिल्ली विभागातील 9 किलोमीटर लांबीच्या पहिल्या सत्राचं (निझामुद्दीन ब्रिज ते दिल्ली-यूपी सीमा) उद्घाटन आज करण्यात आलं. दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे हा देशातील पहिला 14 पदरी महामार्ग आहे. पाच फ्लायओव्हर, चार अंडरपास आणि चार फूटओव्हर ब्रिज अशी या महामार्गाची रचना आहे. यमुना नदीवरही दोन पूल बांधण्यात आले आहेत.

अवघ्या 18 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत दिल्ली विभागातील या महामार्गाचं बांधकाम पूर्ण झालं. यासाठी 842 कोटी रुपये खर्च आला. विशेष म्हणजे सौरऊर्जेचाही पुरेपूर वापर या प्रकल्पात करण्यात आला आहे.


उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये जिल्हा क्रीडा स्टेडियममध्ये इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे (ईपीई) चं उद्घाटन करण्यात येणार आहे. हा देशातील पहिला स्मार्ट आणि हरित एक्स्प्रेस वे आहे.

इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे मुळे राजधानी दिल्लीतील वाहतूक कोंडी अर्ध्यावर येण्यास आणि प्रदूषणाची पातळी 27 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

135 किमी लांबीच्या या महामार्गासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. सौरऊर्जेद्वारे पथदिवे कार्यान्वित होणारा हा देशातील पहिला महामार्ग आहे. दर पाचशे मीटर अंतरावर पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आहे.