Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. हा महामार्ग देशातील सर्वात लांब महामार्ग असल्याचे बोलले जात आहे. या एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितानां संबोधित केले. "गेल्या 9 वर्षांपासून आम्ही पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक करत आहोत. आज दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा पहिला टप्पा देशाला समर्पित करताना मला खूप अभिमान वाटत आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि आधुनिक द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. हे विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम 2014 मध्ये तरतूद केलेल्या रकमेच्या पाचपट आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.   


पंतप्रधान मोदी म्हणाले, "आधुनिक रस्ते, आधुनिक रेल्वे स्थानके, रेल्वे ट्रॅक, मेट्रो आणि विमानतळ बांधले जात आहेत. त्यामुले देशाच्या प्रगतीला गती मिळत आहे. पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणखी गुंतवणूक मिळण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळेच केंद्र सरकार  पायाभूत सुविधांवर सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे. 


पंतप्रधान पुढे म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे राजस्थान आणि देशाच्या प्रगतीचे दोन मजबूत स्तंभ बनणार आहेत. या प्रकल्पांमुळे आगामी काळात राजस्थानसह संपूर्ण प्रदेशाचे चित्र बदलणार आहे. या आधुनिक कनेक्टिव्हिटीचा फायदा सरिस्का व्याघ्र प्रकल्प, केवलदेव आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, जयपूर, अजमेर यासारख्या अनेक पर्यटन स्थळांना होईल. राजस्थान पूर्वीपासूनच देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षक आहे, आता त्याचे आकर्षण आणखी वाढणार आहे. 


Delhi Mumbai Expressway : भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे


दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली-दौसा-लालसोट टप्पा 246 किमी लांबीचा आहे. 12,150 कोटी रुपये खर्च करून तो विकसित करण्यात आला आहे. हा टप्पा सुरू झाल्याने दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ पाच तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे. तर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल, ज्याची एकूण लांबी 1,386 किमी आहे. 


Delhi Mumbai Expressway : सहा राज्यांमधून जाणार एक्सप्रेसवे


या महामार्गामुळे दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पूर्वी या प्रवासाला 24 तास लागायचे, आता हा प्रवास 12 तासात पूर्ण होणार आहे. हा एक्सप्रेसवे (दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे) दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाणार आहे.