सर्जिकल स्ट्राईक, राफेल विमान, रोजगार, शेती संदर्भातील योजना अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी काँग्रेसवर पलटवार केला. 'आजकाल शिवभक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे. मी भगवान शंकरला प्रार्थना करतो की 2024 मध्ये तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव घेऊन याल,' असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.
‘कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही,’ या सोनिया गांधी यांच्या विधानाचाही मोदींनी चांगलाच समाचार घेतला.
महाआघाडीवर टीका
‘2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला तर मी पंतप्रधान होणार ,असं काहीजण म्हणतात. इतरांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत, त्यांचं काय होणार? याबद्दल अजूनही संभ्रम आहे. अविश्वास ठराव ही सरकारची नाही तर काँग्रेसची परीक्षा आहे,’ असं म्हणत मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर टीका केली आहे.
‘या प्रस्तावाच्या आडून काँग्रेसची आपला गटाला फुटण्यापासून वाचवण्याची काळजी आहे. काँग्रेसला त्यांच्या भविष्यातील साथीदारांची परीक्षा घ्यायची असेल तर त्यांनी ती जरुर घ्यावी. पण त्यासाठी अविश्वास प्रस्तावाच्या आडून ही खेळी का केली,’ असा सवाल मोदी यांनी काँग्रेसला केला.
‘राफेल’ भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर
‘या सभागृहात केलेल्या आरोपांमुळे भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांना उत्तर द्यावं लागलं, ही फार दुख:द गोष्ट आहे. अशा बालिश गोष्टी का करता?’ असा सवाल करत त्यांनी राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर दिले.
विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
- अविश्वास प्रस्तावामुळे आम्हाला बोलण्याची संधी
- अविश्वास प्रस्ताव लोकशाहीतील मोठं शस्त्र
- विरोधकांच्या नकारात्मक मानसिकतेचं दर्शन
- 'मोदी हटाव'च्या इच्छेने विरोधक पछाडलेत
- लोकशाहीत जनताच भाग्यविधाती, त्यामुळे लोकशाहीवर विश्वास असायला हवा
- आम्हाला सव्वाशे कोटी देशावासियांचे आशीर्वाद आहेत
- कुठल्याही राजकारणाविना आम्ही 'सबका साथ, सबका विकास' मंत्रानुसार काम करतोय
- 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवली
- 32 कोटी जनधन खाते उघडण्याचं काम आमच्या सरकारने केलं
- 32 कोटी जनधन खाते उघडण्याचं काम आमच्या सरकारने केलं
- एलईडी बल्ब कमी दरात दिले, 100 कोटी घरात बल्ब लागले
- तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 90 हजार कोटी रुपये वाचवले
- बेहिशेबी मालमत्तेचं विधेयक 20 वर्षे मंजूर केलं गेलं नाही, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होता?
- काँग्रेसला स्वत:वरच अविश्वास आहे आणि अविश्वासच त्यांची कार्यशैली आहे
- तुम्हाला एवढी ताकद मिळावी की 2024 मध्ये तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा
- काँग्रेसने देशात अस्थिरता पसरवण्यासाठी अविश्वास प्रस्तावाचा वापर केलाय