नवी दिल्लीमहिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) राज्यसभेतही एकमताने मंजूर झाले. लोकसभेत दोन सदस्यांनी विरोधात मतदान केले होते. मात्र, आज राज्यसभेने एकमताने हे विधेयक मंजूर केले. आता महिला आरक्षण विधेयकाचा कायदा तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेने एकमताने विधेयक मंजूर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून 140 कोटी भारतीयांचे अभिनंदन केले. नारी शक्ती वंदन कायद्यासाठी मतदान करणाऱ्या सर्व राज्यसभा खासदारांचे मी आभार मानतो. असा एकमुखी पाठिंबा खरोखरच आनंददायी असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 


पंतप्रधान मोदी म्हणाले, "संसदेत नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाल्यामुळे, आम्ही भारतातील महिलांसाठी अधिक मजबूत प्रतिनिधित्व आणि सक्षमीकरणाच्या युगाची सुरुवात करत आहोत. हा केवळ कायदा नाही. आपल्या देशाची उभारणी करणाऱ्या असंख्य महिलांना ही श्रद्धांजली आहे. त्यांच्या योगदानामुळे भारत समृद्ध झाला आहे. 


 






लोकसभेनंतर आता राज्यसभेतही (Rajya Sabha) महिला आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर (Women Reservation Bill)  करण्यात आलं आहे. जवळपास दहा तास चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 171 विरूद्ध 0 अशा एकमताने पास करण्यात आलं आहे. या विधेयकाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे आपण सर्वांचं आभार मानतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 


लोकसभेत या आधीच 454 विरुद्ध 2 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यानंतर आता राज्यसभेतही हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.


हा जुमला ठरू नये; काँग्रेसचा टोला


राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी  चर्चेदरम्यान सांगितले की, मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभा आहे. माझा पक्ष आणि इंडिया (INDIA) आघाडीचे पक्ष या विधेयकाला मनापासून समर्थन देत आहेत. यामध्ये ओबीसींना आरक्षण नाही. तुम्ही त्यात सुधारणा करून ओबीसींना आरक्षण देऊ शकता. ओबीसी महिलांना मागे का सोडत आहात? तसेच तुम्ही त्याची अंमलबजावणी कधी करणार आहात हे स्पष्ट करा, तारीख सांगा असे आवाहन करताना आम्ही समर्थन करत आहोत, परंतु हा कायदा निवडणुकीसाठीचा जुमला असू नये असेही खरगे यांनी यांनी म्हटले.