PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71वा वाढदिवस. यानिमित्तानं भाजपकडून भव्यदिव्य तयारी करण्यात आली आहे. मोदींचा वाढदिवस भव्य पद्धतीनं साजरा करण्यासाठी भजपनं कंबर कसली आहे. भाजपनं 20 दिवसांच्या राष्ट्रव्यापी अभियानाची योजना आखली आहे. या अभियानाला आजपासून सुरुवात केली जाणार असून 7 ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अभियानाला सेवा आणि समर्पणाचं नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान, 20 दिवसांचं अभियान राबवण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे, 20 दिवसांनी म्हणजेच, 7 ऑक्टोबर रोजी 20 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपनं हे अभियान 7 ऑक्टोबरपर्यंत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच भाजपनं यासाठी चार सदस्यीय समिती तयार केली आहे. ही समिती पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. दरम्यान, या समितीचं नेतृत्त्व कैलाश विजयवर्गीय करत आहेत.
असं सांगितलं जात आहे की, रक्तदान शिबिर, मोदींच्या जीवनावरील प्रदर्शन यांसारखे कार्यक्रम या अभियानातंर्गत आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासोबतच पक्षाच्या सर्व कार्यालयांमधून लाखोंच्या संख्येनं मोदींना पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत.
देशभरात मोदींच्या वाढदिवसाची जंगी तयारी
संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची जंगी तयारी करण्यात आली आहे. सगळे कार्यकर्ते, नेते तयारी करण्यात व्यस्त आहेत. भाजपनं पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, आसाम, बंगळुरु, कर्नाटक, पाटना येथे भव्य तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपनं मोदींचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
काँग्रेसही साजरा करणार मोदींचा वाढदिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेस देशभरात साजरा करणार आहे. 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. हा दिवस युथ काँग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार आहे. बेरोजगारी दिवसाच्या अंतर्गत काँग्रेसकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ असं आश्वासन नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी दिलं होतं, याचीच आठवण युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी करून दिली.
ते म्हणाले की, 'रोजगाराचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी आज रोजगाराबद्दलच गप्प आहेत. देशातील बेरोगजारीचा दर 2.4 टक्क्यांवरून 10.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकार असमर्थ ठरलंय,' अशी टीका श्रीनिवास यांनी केली.