Delhi Bomb Blast PM Modi: देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरून गेली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. काल रात्रीपासूनच दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर गेले आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नियोजित दौरा कायम ठेवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा भूतानचा चौथा दौरा असून, या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री व भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. दरम्यान, एकीकडे दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली असतानाच पीएम मोदी भूतान दौऱ्यावर गेल्याने विरोधकांनी त्यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय.
PM Modi Bhutan Tour: चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक संयुक्तपणे 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्संगचू-२ जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी भूतानला 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करतील. तसेच ते भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, मोदी भूतानमध्ये सुरू असलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवातही सहभागी होतील. पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देऊन शांतीसाठी प्रार्थना करतील.
PM Modi Bhutan Tour Schedule: पंतप्रधान मोदींच्या भूतान दौऱ्याचे वेळापत्रक
11 नोव्हेंबर
- पंतप्रधान मोदी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतील.
- 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचू-II जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्त उद्घाटन करतील.
-भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित राहतील.
- जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात सहभागी होतील आणि भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना दर्शन देतील.
12 नोव्हेंबर
- पंतप्रधान मोदी भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतील.
- ऊर्जा, रेल्वे, रस्ते कनेक्टिव्हिटी आणि विकास प्रकल्पांवरील सहकार्याबाबत चर्चा होईल.
- भारत भूतानला 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत देईल.
- भूतानच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेसाठी सहकार्य आणि भागीदारीविषयीही चर्चा केली जाईल.
दिल्लीत नेमकं काय घडलं? (Delhi Bomb Blast)
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत किमान 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर परिसरातील काही वाहनांनी पेट घेतला होता. या स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर देशभरातील अनेक महत्वाच्या शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकाता, हैदराबाद, डेहराडूनमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमधील काही महत्वाच्या शहरांत देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आणखी वाचा