नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्यांदा 'मन की बात'द्वारे जनतेशी संवात साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी जल संरक्षणाचं महत्त्व बोलून दाखवलं आणि देशातील विविध भागातील पाणीटंचाईवरही भाष्य केलं. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या याबाबतही माहिती दिली.


पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. देशातील नागरिकांना ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाला जन आंदोलनाचं स्वरुप दिलं होतं, त्याप्रमाणे जलसंधारणासाठीही सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.


देशात जलसंधारणाच्या अनेक पारंपरिक पद्धती आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. त्या विविध पद्धतींची माहिती एकमेकांना दिली पाहिजे. तसेच जलसंधारणासाठी काम करणाऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा खासगी संस्थेबद्दल माहिती असल्यास, त्याची माहिती इतरांना दिली पाहिजे, असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.


देशात पाणी प्रश्न आजच्या स्थितीत गंभीर बनत चालला आहे. त्यासाठी लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवायला हवे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti या हॅशटॅगचा उपयोग करत सोशल मीडियावर आपल्याकडील माहिती शेअर करावी, असंही मोदींनी आवाहन केलं.


देशातील जनतेने पुन्हा देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सर्वांचे आभार मानले. जनतेला विकास हवा आहे, म्हणून त्यांनी पुन्हा देशसेवा करण्याची संधी दिल्याचं त्यांनी म्हटलं. सत्तेत मी आलो नाही, तर लोकांनीच मला परत आणले आहे, असंही मोदींनी म्हटलं.