मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याने देशभरात या विधानाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. जागतिक स्तरावर वाढलेले तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयावरील दबाव आणि परकीय चलन साठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ही विनंती करण्यात आली आहे. भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर परदेशात जातात. त्यामुळे सोने खरेदी कमी झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळू शकतो.

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी यांनी 10 मे 2026 रोजी हैदराबादमधील कार्यक्रमात देशभक्तीचा अर्थ केवळ सीमेवर लढणे नसून कठीण काळात जबाबदारीने वागणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासोबतच एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचेही आवाहन केले. यामागे भारताचा परकीय चलन साठा मजबूत ठेवण्याचा आणि डॉलरची बचत करण्याचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.

Gold Import in India : भारताचा 72 अब्ज डॉलरचा सोने आयात खर्च

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश आहे. देशात दरवर्षी सुमारे 700 ते 800 टन सोन्याची मागणी असते, तर देशांतर्गत उत्पादन अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे गरजेपैकी सुमारे 90 टक्के सोने आयात करावे लागते. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने सुमारे 72 अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले. हे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 24 टक्क्यांनी अधिक आहे.

Continues below advertisement

Forex Reserve Impact : परकीय चलन साठ्यावर काय परिणाम?

भारताचा परकीय चलन साठा सध्या सुमारे 690 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. मात्र जागतिक अस्थिरता आणि वाढत्या आयातीमुळे त्यावर दबाव निर्माण झाला आहे. सोने आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च होतात. जर देशातील नागरिकांनी काही काळासाठी सोने खरेदी कमी केली, तर डॉलरची बचत होऊन परकीय चलन साठा मजबूत राहण्यास मदत होईल.

Current Account Deficit : चालू खात्यातील तूट कमी करण्यास मदत

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार 2026 मध्ये भारताचा चालू खात्यातील तूट 84.5 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकते. जर सोने आयात 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाली, तर 20 ते 25 अब्ज डॉलरची बचत होऊ शकते. आयात निम्म्यावर आली, तर तब्बल 36 अब्ज डॉलरची बचत शक्य आहे. ही बचत चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

PM Modi Appeal : देशभक्ती आणि आर्थिक शिस्तीचा संदेश

पंतप्रधान मोदींच्या या आवाहनातून आर्थिक शिस्त, स्वावलंबन आणि राष्ट्रीय हितासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. सोने खरेदी कमी करणे, इंधनाची बचत करणे आणि संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते.

ही बातमी वाचा: