नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास संबोधित करताना शिक्षण क्षेत्राशी संबंधित पाच महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ केला. यामध्ये भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष, बोलणारी पुस्तके, सीबीएसईच्या शालेय गुणपत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा, निष्ठा (NISHTHA) - निपुण भारत (NIPUN Bharat) आणि विद्यांजली पोर्टल यांचा समावेश आहे. डिजिटल मोडद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, शिक्षक पर्वाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या या नवीन योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देश सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतर भारत कसा असेल यासाठी देश नवीन संकल्प घेत आहे.
देश सध्या स्वातंभ्यांचाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यामुळे या शिक्षक पर्व परिषदेनिमित्त, अनेक नवीन योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत ज्या विशेष महत्त्वाच्या आहेत. स्वातंत्र्याच्या 100 वर्षांनंतर भारत कसा असेल यासाठी नवीन संकल्प करायचा आहे. महामारीच्या काळात ही शिक्षणाचे आव्हान पेलल्याबद्दल पंतप्रधांनांनी विद्यार्थी, शिक्षक आणि समस्त शिक्षण क्षेत्राचे कौतुक केले. या कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी ज्या क्षमता निर्माण झाल्या आहेत, त्या तशाच कायम ठेवण्याचे आवाहन केले. जर आपण परिवर्तनाच्या मध्यावर असू, तर सुदैवाने आपल्याकडे आधुनिक आणि भविष्यवादी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण केवळ सर्वसमावेशक नसावे, तर ते न्याय्य असले पाहिजे. त्यांनी असेही नमूद केले की, नॅशनल डिजिटल आर्किटेक्चर म्हणजेच N-DEAR हे शिक्षणातील असमानता दूर करण्यात आणि आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यूपीआय इंटरफेसने बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवल्याप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये N-DEAR हे `सुपर - कनेक्ट` म्हणून काम करेल. टॉकिंग बुक्स आणि ऑडिओ बुक्स यासारख्या तंत्रज्ञानाला आपला देश आता शिक्षणाचाच एक भाग बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.