नवी दिल्ली: रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना, पान खाऊन पिचकारी मारणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतल्या भाषणाला 125 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी आज देशभरातल्या तरुणांशी संवाद साधला.  दिल्लीतल्या विज्ञान भवनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

विशेष गोष्ट म्हणजे मोदींच्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण देशभरातली सर्व विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दाखवलं गेलं.

स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा दाखला देत मोदींनी सध्याच्या अनेक प्रश्नांवर बोट ठेवलं. मंदिरात जाऊन देव शोधण्यापेक्षा लोकांच्या आणि समाजाच्या कार्यात देव पाहा, असं मोदी म्हणाले.  त्याचबरोबर उठसूठ रस्त्यांवर अस्वच्छता करणारे, साधे नियमदेखील न पाळणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे का.. असा प्रश्नही मोदींनी केला.

तसंच देवालयापेक्षा शौचालयं महत्त्वाची आहेत, असं मोदींनी नमूद केलं.

आज आपण स्वच्छता करा किंवा नका करु, पण अस्वच्छता करण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. मी पूर्वी म्हटलं होतं, आधी शौचालय, मग देवालय. त्याप्रमाणे अनेक मुलींनी शौचालयाअभावी लग्न नाकारलं. पान खाऊन पिचकारी मारुन भारताला अस्वच्छ करणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही, वंदे मातरम म्हणण्याचा सर्वाधिक अधिकार हा सफाईचं काम करणाऱ्यांना आहे, असं मोदी म्हणाले.