गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान होत असताना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याची संधी सोडली नाही.
आपले मोठे बंधू सोमभाई यांना चरणस्पर्श करुन मोदी राणिपच्या मतदान केंद्रात गेले. यावेळी ते बराच वेळ रांगेत उभे होते. यावेळी ते लोकांना हात हलवून अभिवादन करत राहिले.
मतदानाचा हक्क बजावल्यनंतर शाई लावलेलं बोट दाखवत त्यांनी आधी पायी आणि नंतर गाडीच्या फूटबोर्डवरुन जवळपास 500 मीटरहून जास्त अंतर एक मिनी रोड शोच केला.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. तसंच मोदी -मोदी असा गजरही सुरु होता.
दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी 851 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 39 टक्के मतदानाची नोंद झालीय. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कमी झालेलं मतदानही यावेळी भरुन निघेल अशी आशा आहे.
काँग्रेसचा आरोप
दरम्यान, मोदींनी मतदानाच्या दिवशी रोड शो करुन, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप, काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोग भाजपाला विशेष सूट देत असल्याचा दावा, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला.
दिग्गजांचं मतदान
दरम्यान मोदींच्या आधी आज सकाळी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मतदान केलं.
यावेळी अमित शाह यांनी गुजरातच्या विकासाआड येणाऱ्यांना पराभूत करा, असं आवाहनही केलं. ते सपत्नीक मतदानासाठी आले होते.
तर आनंदीबेन पटेल यांनी गुजरातमध्ये हार्दिक पटेल फॅक्टर फारसा परिणामकारक ठरणार नाही, असं म्हटलंय.
तिकडं अरुण जेटली यांनी सामान्यांप्रमाणे अगदी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला.
हार्दिक पटेलचं मतदान
दुसरीकडे भाजपचा कट्टर विरोधक आणि काँग्रेसच्या टीममधला मोठा भागीदार हार्दिक पटेलनं विरामगाम या आपल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी हार्दिकनं अहंकारी लोकांना पराभूत करा, असं आवाहनही केलं. सध्या हार्दिक अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये वास्तव्याला असतो.
दरम्यान हार्दिकच्या आधीच त्याचे वडील भरतभाई, आई उषाबेन आणि बहीण मोनिका यांनीही मतदान केलं. यावेळी हार्दिकची आई उषाबेन यांनी आपल्याला हार्दिकच्या जीवाची काळजी वाटते, असं सांगून मनातली भीती आणि काळजीही व्यक्त केली.
हिराबेन यांचं मतदान
तर गांधीनगरमध्ये आपल्या धाकट्या मुलाकडे म्हणजे पंकजभाईंकडे राहणाऱ्या मोदींच्या आई हिराबेन यांनीही मतदानाचा हक्क बजावला.