वाराणसी : काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि नंतर सोनिया गांधी हरवल्याचे पोस्टर्स त्यांच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात लागले होते. आता त्याच धर्तीवर वारणसीतही पंतप्रधान मोदी हरवले असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर पोलिसांनी तत्काळ हटवले आहेत.


वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असून, या मतदारसंघातील सिगरा आणि कचहरी परिसरात अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदी हरवल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर 'जाने वो कोन सा देश जहाँ तुम चले गये,' असा उपहासात्मक संदेश लिहिण्यात आला आहे.

या पोस्टर्सवर लिहिलंय की, ''मार्च 2017 मधील 4,5 आणि 6 तारखेला वाराणसीच्या जनतेमधून फिरताना, रोड शो करताना, आणि इतर माध्यमांतून निवडणुकीत मतदारांना आवाहन करताना त्यांना शेवटी पाहिलं होतं. यानंतर ते बेपत्ता आहेत. त्यांचा शोध लागत नसल्याने, काशीवासियांना नाईलाजास्तव पोलिसात तक्रार दाखल करावी लागेल.''



हे पोस्टर लावणाऱ्याचं नाव स्पष्ट नसून, यावर निवेदक लाचार, बेबस आणि हताश काशीची जनता असं नमूद करण्यात आलं आहे. वाराणसी पोलिसांनी हे पोस्टर्स तत्काळ हटवले असून, पोस्टर लावणाऱ्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी 4 ते 6 मार्च दरम्यान आपल्या वाराणसी मतदारसंघाचा दौरा केला होता. यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसाभ निवडणुका सुरु असल्याने, पंतप्रधान मोदींनी आपल्या मतदार संघात दोन दिवस रोड शो करत, जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं.

तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी 22 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी मतदारसंघातील विविध योजनांचा शुभारंभही केला होता. पण मार्च 2017 नंतर ते मतदारसंघात फिरकले नाहीत. दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याची जोरदार चर्चा सध्या वाराणसीत रंगत आहे.

संबंधित बातम्या

राहुल गांधींपाठोपाठ सोनिया गांधी हरवल्याचे पोस्टर

अमेठीत राहुल गांधी हरवल्याचे पोस्टर, काँग्रेसचा भाजप आणि संघावर हल्लाबोल