नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (सोमवार 5 जुलै) कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्हवर आपले विचार मांडणार आहेत. यात भारत कोविडचा सामना करण्यासाठी जगभरात डिजिटल पब्लिक गुडच्या रूपात कोविनला ऑफर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने दिली आहे.

 

जगभरातील देश सध्या कोविड 19 विषाणू संसर्गाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी 5 जुलैला कोविन अॅप संदर्भात आपले विचार मांडणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. लसीकरण हे कोविडविरोधात सर्वात मोठं हत्यार आहे. कोविन या डिजिटल प्लटफॉर्ममुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या प्लटफॉर्म जगभरात खुला करण्यासाठी भारत ऑफर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान तिसऱ्या लाटेची शक्यताकोविड प्रतिबंधात्मक नियामांचे पालन न केल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट शिगेला पोहोचू शकते, असा इशारा कोरोना साथीच्या रोगाशी संबंधित सरकारच्या पॅनेलमध्ये सामील वैज्ञानिक, प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी दिला आहे. या पॅनेलवर कोविड 19 केसेसच्या मॉडलिंग करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटलं की, तिसऱ्या लाटेत दररोज रुग्णसंख्या तुलनेने कमी असेल मात्र जर नवीन कोरोना स्ट्रेन आला तर तिसऱ्या लाटेदरम्यान संसर्ग झपाट्याने पसरू शकतो.

प्राध्यापक अग्रवाल यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "आम्ही तीन सिनेरियो तयार केले आहेत. एक आशावादी आहे. यात आमचा विश्वास आहे की ऑगस्टपर्यंत जीवन सामान्य होईल आणि नवीन कोणताही म्युटेंट तयार होणार नाही. दुसरा ज्यात आम्ही असे मानतो की लसीकरण 20% कमी प्रभावी आहे. आणि तिसऱ्यात आम्ही मानतो की, नवीन वेरिएंट येऊ शकतो आणि ज्यामुळे 25 टक्के जास्त प्रसार होईल. मात्र तो डेल्टा प्लस वेरिएंट नसेल असंही त्यांनी सांगितलं.