नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या दौऱ्यादरम्यान संयम बाळगावा, असा सल्ला भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोदींना दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या 'फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सिंह बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी आपल्या आचरणाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले पाहिजे. त्यांची वर्तणूक पंतप्रधानपदाला अनुरुप असायला हवी, असेदेखील मनमोहन सिंह भाषणादरम्यान म्हणाले. सिंह म्हणाले की, पंतप्रधानांना माझा सल्ला आहे, त्यांनी संयम बाळगत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा सांभाळली पाहीजे. सध्या काही राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या प्रचारसभांमध्ये खालच्या स्तराची भाषा वपरली जात आहे. पंतप्रधान म्हणून मी जेव्हा भाजपशासीत प्रदेशांमध्ये निवडणुकीच्या दौऱ्यासाठी जात होतो, तेव्हा त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर माझे चांगले संबंध असायचे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान याला दुजोरा देतील. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्याला काल 10 वर्ष पूर्ण झाली. याबाबत सिंह यांना विचारले असता ते म्हणाले की, "मला आशा आहे की, दहशतवादी हालचालींवर लगाम लावण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये योग्य पाऊल उचलले जाईल. काश्मीरमध्ये सध्या जे सुरु आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वातावरण बिघडले आहे."