पटना: बिहार विधानसभा निवडणूकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा बिहारमध्ये येऊन निवडणूकीत रंग भरला आहे. रविवारी त्यांनी छपरामध्य़े सभा घेतली आणि विरोधी पक्षांवर घणाघाती टीका केली. या सभेमध्य़े त्यांनी बिहारच्या महिलांना साद घातली आणि आश्वासन दिले की त्यांनी निर्धास्त होऊन छट पूजेची तयारी करावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "कोरोनाच्या काळात छटपूजा कशी साजरी करायची याची चिंता कोणत्याही माता-भगिनींना करण्याची गरज नाही. तुमच्या या पुत्राला तुम्ही दिल्लीत सत्तेत बसवलं आहे. त्याला तुमच्या छटपूजेची काळजी नसेल का? तुम्ही छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी करा. तुमचा पुत्र तुम्हाला उपाशी झोपू देणार नाही."
"छटपूजा होईपर्यंत महिलांना मोफत रेशन धान्य दिल्याने त्यांना मोठा आधार मिळणार आहे. एवढेच नाही तर बिहारच्या अनेक भगिनींच्या खात्यात थेट पैसे जमा झाले. उज्वला योजनेअंतर्गत त्यांना गॅस मोफत देण्यात आला" असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. ते म्हणाले की, "आज आपण ज्या आत्मनिर्भर बिहारचे स्वप्न घेऊन वाटचाल करत आहोत त्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन हे सुशासन आहे."
सुत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते की कोरोनाचा काळ लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये छटपूजा होईपर्यंत मोफत रेशनचे धान्य देण्याची घोषणा केली आहे. या आधीही नरेंद्र मोदींनी सांगितले होते की बिहारमध्ये छटपूजा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. त्यामुळे तिथल्या माता भगिनींना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्रसरकार त्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देणार आहे. यावेळी गहू आणि तांदळासोबतच चणेदेखील देण्यात येणार आहेत. छटपूजेमध्य़े चण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
बिहारमध्य़े दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या टप्प्यात 17 जिल्ह्यातील 94 जागांसाठी होणााऱ्या निवडणूकीसाठी आज रविवारी संध्याकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. यामध्य़े महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, त्यांचे भाऊ तेजप्रसाद यादव, मंत्री नंदकिशोर यादव यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या टप्प्यात राजधानी पटनाच्या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण 1463 उमेदवारांचे भविष्य मंगळवारी मतदानपेटीत बंद होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: