नवी दिल्ली : "प्रणव मुखर्जी माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांनी माझं बोट धरुन वडिलांप्रमाणे मार्गदर्शन केलं," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. यावेळी मुखर्जींबद्दल बोलताना मोदी गहिवरले.


'प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी अ स्टेट्समन', या फोटोंच्या पुस्तकांचं प्रकाशन राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. त्यावेळी मोदी बोलत होते. 24 जुलै रोजी राष्ट्रपती मुखर्जींचा कार्यकाळ संपणार आहे.

मोदी म्हणाले की, "प्रणवदा वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतात. ते कायम माझ्या प्रकृतीची काळजी करतात. उत्तर प्रदेश निवडणुकीतील माझं व्यस्त वेळापत्रक पाहून ते म्हणायचे की, इतकी धावपळ का करता? प्रकृतीचीही काळजी घ्या. खरंतर ही राष्ट्रपतींचं काम किंवा जबाबदारी नाही, पण ते असं करायचे. प्रणवदा कायम माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. मला प्रणव दा यांचं बोट पकडून दिल्लीच्या जीवनशैलीत पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यांनी मला वडिलांसारखं मार्गदर्शन केलं."

"प्रत्येक भेटीत ते मला वडिलांसारखेच भासत. एखादा पिता आपल्या मुलांची जशी काळजी घेतो, तशीच काळजी ते माझी घेत, हे मी अगदी मनापासून सांगतोय. ते कायम बोलायचे, हे पाहा मोदीजी अर्धा दिवस तर आराम करावा लागेल. काही कार्यक्रम कमी करा. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा. विजय-पराभव तर होतच राहतो, पण शरीराकडे लक्ष द्याल की नाही. त्यांची व्यक्तमत्त्व, संबंध प्रेरणादायी आहेत," अशा शब्दांत मोदींन प्रणव मुखर्जी याचं कौतुक केलं.