ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज मोदींनी सुप्रसिद्ध अशा जशोरेश्वरी काली माता मंदिराला भेट दिली आणि देवीची पूजा केली. जशोरेश्वरी काली मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक सुगंधा शक्तिपीठ मानलं जातंय. हे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आलं आहे. 


पंतप्रधानांनी जशोरेश्वरी देवीला मुकुट घातला आणि देवीच्या चरणी साडी अर्पण केली. त्यानंतर मंत्रोच्चारामध्ये देवीची पूजा केली. या मंदिराचे आणि पश्चिम बंगालचे एक विशेष नाते आहे. असंही सांगण्यात येतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिराला भेट देऊन पश्चिम बंगालच्या मतदारांना एक प्रकारचा राजकीय संदेश दिलाय. 


बांग्लादेश या वर्षी त्या देशाच्या 50 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच या वर्षी भारत आणि बांग्लादेशच्या संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बांग्लादेशची निवड केली आहे.


भारताचे बांग्लादेशसोबत असणारे संबंध मजबूत आणि सौदार्हपूर्ण आहेत. नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांग्लादेशला वेळोवेळी मदत केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांग्लादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांग्लादेशला कोरोना लसीचे 90 लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांग्लादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.


गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत व्हर्च्युअली मीटिंग केली होती. त्यावेळीच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. जानेवारी 2021 मध्ये बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन भारत भेटीवर आले होते. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेले होते.


महत्वाच्या बातम्या :