नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राजीनामा दिला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना वेटिंग लिस्टवर टाकलं आहे. पण लवकरच मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे आणि सुरेश प्रभूंच्या खांद्यावर पर्यावरण मंत्रालयाची धुरा येऊ शकते.


येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना थोडे दिवस थांबण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसातील रेल्वे मंत्रालयातील घटनाक्रम पाहता, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं खातं बदललं जाण्याची शक्यता अधिक आहे.

गेल्या चार दिवसात झालेल्या दोन रेल्वे अपघातांमुळे निशाण्यावर असलेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला. मात्र पंतप्रधान मोदींनी तूर्तास प्रभू यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे.

शनिवारी म्हणजे 19 ऑगस्टला उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. ज्यात 23 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोपही झाला. आणि त्यानंतर आज पहाटे उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेसनं डंपरला धडक दिल्यानं  डबे रुळावरुन घसरले. या घटनेत 70 प्रवाशी जखमी झालेत.

या दोन्ही घटनांमुळे माध्यमांनी सुरेश प्रभूंच्या कारभारावर टीका केली. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रभूंनी राजीनामा पंतप्रधानांकडे सोपवला.

यानंतर सोशल मीडियावर प्रभूंना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा पाऊस पडतोय. त्यांच्या काळात रेल्वेत झालेल्या सुधारणांमुळे प्रभूच रेल्वेला नीट न्याय देऊ शकतात असं लोकांचं म्हणणं आहे.