नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. नव्या वर्षातील पंतप्रधान मोदींची पहिली मन की बात होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "26 जानेवारी रोजी झालेला तिरंग्याचा अपमान पाहून फारच दुखी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "राष्ट्रपतींनी संयुक्त सत्राला संबोधित केल्यानंतर 'बजेट सत्र' सुरु झालं आहे. अशातच आणखी एक गोष्ट घडली, ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो, ती म्हणजे पद्म पुरस्कारांची घोषणा. यंदाही पद्म पुरस्कारांच्या यादीत त्या लोकांचा समावेश आहे, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केलं आहे. आपल्या कार्यानं अनेकांचं जीवन बदललं आहे."


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या महिन्यात भारतीय क्रिकेट संघानेही चांगली कामगिरी केली. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीला अनेक खचता खाल्यानंतर, शानदार वापसी करत ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेली मालिका आपल्या नावे केली. आपल्या खेळाडूंचं परिश्रम आणि एकता प्रेरणा देणारी आहे.


तिरंग्याचा अपमान पाहून देश दुखी झाला : पंतप्रधान


त्यानंतर 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "यासर्व घडामोडींमध्ये दिल्लीत 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून देश अत्यंत दुखी झाला."


तरुणांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्यावर लेखन करावं : पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना स्वातंत्र्य सैनिकांबाबत लिहण्याचंही आव्हान केलं आहे. ते म्हणाले की, "मी सर्व देशातील जनतेला आणि खासकरुन तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी देशातील स्वातंत्र्य सैनिकांबाबत लिहावं. आपल्या परिसरात स्वातंत्र्य संग्रामातील वीरता आणि त्यांच्या कथा यासंदर्भात पुस्तकं लिहा. जेव्हा भारत आपला 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल, त्यावेळी तरुणांनी केलेलं हे लेखन स्वातंत्र्य सैनिकांना उत्तम श्रद्धांजली ठरले."


पंतप्रधान मोदी कोरोना संकटावर बोलताना म्हणाले की, "कोरोना विरोधात भारताची लढाई जगासमोर एक उदाहरण बनली आहे. अशातच आपली लसीकरण मोहीमही जगभरात एक उदाहरण आहे. संकटकाळात भारत स्वतः आत्मनिर्भर असल्यामुळे इतर देशांचीही मदत करु शकला."