PM Modi Mann Ki Baat : अवयवदान (Organ donation) एखाद्याला नवीन जीवन देण्याचे मोठं माध्यम बनलं आहे. माणसाच्या मृत्यूनंतर देहदान केल्यामुळं आठ ते दहा जणांना नवीन जीवन मिळण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. आज 'मन की बात'चा 99 वा भाग प्रसारित झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी अमृतसरमध्ये राहणाऱ्या एका खास कुटुंबाशी देखील संवाद साधला. 


आजच्या मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदानाचे महत्व सांगितले. अवयवदानासाठी कोणताही वयोमर्यादा नाही. रुग्ण कोणत्याही राज्यात अर्ज करु शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आजच्या मन की बात कार्यक्रमामधून पंतप्रधान मोदींनी अमृतसरमध्ये राहणाऱ्या एका खास कुटुंबाशी थेट संवाद साधला. अमृतसरचे रहिवासी असलेले सुखबीर सिंग संधू आणि त्यांची पत्नी सुप्रीत कौर यांना एक मुलगी होती. घरातील लोकांनी प्रेमाने तिचे नाव अबावत कौर ठेवले. अबावत या चिमुकलीनं अवघ्या 39 दिवसांत जगाचा निरोप घेतला होता.  बाळाच्या मृत्यूनंतर सुखबीर सिंग संधू आणि त्याची आई सुप्रीत कौर यांनी अबावतचे अवयव दान करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. पंतप्रधानांनी या दोघांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यासोबतच पंतप्रधान मोदी हे झारखंडच्या स्नेहलता चौधरी यांच्याबद्दलही बोलले. त्यांच्या कुटुंबाने देखील अवयवदान करण्याचा मोठा निर्णय घेतला.


जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावं , पंतप्रधानांचं आवाहन


सरकारने अवयवदानासाठी 65 वर्षांखालची वयोमर्यादा ठरवली होती. मात्र, ही अट आता रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं.  तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य घडवू शकतो असेही पंतप्रधान म्हणाले.अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशात समान धोरणावर काम केले जात आहे. या दिशेने राज्यांचे कायमस्वरुपी रहिवासी असण्याची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


स्त्रीशक्तीचा सन्मान 


आज भारताची क्षमता नव्या जोमानं समोर येत आहे. त्यात आपल्या स्त्रीशक्तीचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव आणि ऑस्कर विजेते निर्माते गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांचाही उल्लेख केला. दरम्यान, जेव्हा मी जगभरातील लोकांना भेटतो तेव्हा ते अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताच्या अभूतपूर्व यशाचे कौतुक करतात असे पंतप्रधान म्हणाले. आज प्रत्येक देशवासीय सौरऊर्जेचे महत्त्व समजून घेत आहेत, याच मला कौतुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींची 'मन की बात' आज; नेमकं कुठल्या मुद्द्यावर संवाद? देशवासियांचं लक्ष