PM Narendra Modi Mann Ki Baat 100 Episodes : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) या बहुचर्चित कार्यक्रमाचा 100 वा भाग लवकरच प्रसारित होणार आहे. हा भाग खूपच खास असणार आहे. 100 व्या भागानिमित्त सरकारने 100 रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल 2023 रोजी 'मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. हा भाग प्रसारित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी (BJP) खूप मेहनत घेत आहे. एक लाखापेक्षा अधिक मंडळींना बूथवर 100 वा भाग ऐकता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. 


100 रुपयांचं नाणं कसं असेल? 


रजत, तांबे, निकिल आणि जस्ता या चार धातूंपासून हे 44 मिलीमीटरचं 100 रुपयांचं गोलाकार नाणं बनवण्यात आलं आहे. नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. त्याच्या खाली 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले असेल. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये 'भारत' तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये 'India' असं लिहिलेलं आहे. 


नाण्याच्या मागच्या बाजूला 'मन की बात'च्या 100 व्या भागाचं प्रतिक असलेलं खास चिन्ह असणार आहे. मायक्रोफोनचं चित्र आणि त्यावर 2023 असे लिहिलेले असेल. तसेच या चित्राच्या वरच्या बाजूला देवनागरीमध्ये 'मन की बात 100' आणि इंग्रजीत 'Mann Ki Baat 100' असं लिहिण्यात आलं आहे. 


100 रुपयांचं नाणं कधी-कधी जारी करण्यात आलं आहे? 


नरेंद्र मोदी यांनी याआधीदेखील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सलग चार वर्षांसाठी 100 रुपयांचं नाणं जारी केलं होतं. तसेच नरेंद्र मोदी यांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्तदेखील 100 रुपयांचं नाणं जारी केलं होतं. तसेच महाराणा प्रताप यांच्या 476 व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होतं. 2010,2011,2012,2014 आणि 2015 सालीदेखील 100 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होतं. 


देशासह-परदेशात 'मन की बात'ची चर्चा


नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाची देशभरात चर्चा आहे. तसेच परदेशातदेखील या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. 100 व्या भागात 'पद्म भूषण' आणि 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या दिग्गजांचा सन्मान करण्यात येणार आहे. या 100 व्या भागाची देशासह परदेशातदेखील चांगलीच चर्चा रंगली आहे. 


संबंधित बातम्या


Mann Ki Baat : अवयवदानासाठी पुढे यावं, त्यासाठी कोणतीही अट नाही; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन