नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन 5 ची घोषणा केली आहे. त्यानुसार देशातील कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. मात्र कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात टप्प्याटप्याने सूट देण्यात येणार आहे. यापुढे आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासाला कसलीही परवानगी लागणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासंबंधीचे निर्णय राज्य सरकारंही घेऊ शकतात.


मालवाहतूक तसेच व्यक्तींना विनापरवाना आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवास/वाहतूक करता येणार आहे. यासाठी कुठल्याही ई-परमिट किंवा ई-पासची गरज लागणार नाही. मात्र राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीच्या आकलनानुसार आवश्यक वाटलं तर ते जिल्हांतर्गंत तसेच राज्याबाहेरच्या प्रवासावर निर्बंध घालू शकतात.


Lockdown 5.0 | देशभरात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, ल़ॉकडाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित


लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. हा लॉकडाऊन मुख्यत्वे तीन फेजमध्ये असणार आहे. प्रत्येक फेजमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे.



नव्या नियमानुसार रात्री कर्फ्यूमध्ये कपात करण्यात आली आहे. रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे, मात्र, अत्यावश्यक बाबींसाठी कर्फ्यूची बाधा राहणार नाही. याआधी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यूची मर्यादा होती.


पहिला टप्पा

- 8 जूनपासून धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट उघडणार आहे. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळेल.

- संपूर्ण देशात 30 जूनपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार.


दुसरा टप्पा

- शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, यांचा जुलै महिन्यात राज्य आणि केंद्राच्या परवानगीनंतर उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, यासाठीची नियमावलीही जारी करण्यात येणार आहे. या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे.


तिसरा टप्पा

- कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो, चित्रपटगृह, स्विमींग पूल, सार्वजनिक कार्यक्रमाचे हॉल, व्यायाम शाळा, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार तसेच सार्वजनिक, राजकीय, धार्मिक, मनोरंजनपर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.




Unlock 0.1 देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,अटी शर्तींसह धार्मिक स्थळ, हॉटेल्स सुरू करण्याची मुभा