नवी दिल्ली : जे राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या नावाने मतं मागतात त्यांना बाबासाहेबांपेक्षा आजकाल भोले बाबांची आठवण येऊ लागलीय, अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकरांच्या नावाने राजधानीत होणारी ही पहिलीवाहिली वास्तू असल्याने याचं विशेष महत्व आहे.

समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी हे सेंटर काम करत राहील, आंबेडकरांचा विचार सर्वदूर पोहोचण्यास त्यामुळे मदत होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दिल्लीतल्या 15, जनपथ रोडवर हे सेंटर उभारण्यात आलं आहे. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनलची ही इमारत बुद्धिस्ट आणि आधुनिक शैलीच्या संगमातून उभारलेली आहे.

या ठिकाणी सेमिनार आणि कॉन्फरन्स हॉल, शिवाय तीन प्रेक्षागृह, सुसज्ज लायब्ररी उभारण्यात आली आहे. दिल्लीत साडेतीन एकरावर उभी राहिलेली ही वास्तू बाबासाहेबांच्या अभ्यासकांसाठी एका तीर्थक्षेत्रासारखी व्हावी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

दरम्यान, पटेलांप्रमाणेच आंबेडकरांवरही काँग्रेसने कसा अन्याय केला, याचा पाढा यावेळी मोदींनी भाषणातून वाचला. 1992 मध्ये नरसिंहराव हे पंतप्रधान असताना बाबासाहेबांच्या नावाने अशा केंद्राची संकल्पना मांडली गेली होती. मात्र इतकी वर्षे हे काम पूर्ण करण्याची तसदी कुणी घेतली नाही, असा आरोप मोदींनी केला.

या आंबेडकर सेंटरसोबतच दिल्लीतलं अलीपूर रोड, मुंबईतलं इंदू मिल या स्मारकांचं कामही वेगाने पूर्ण केलं जाईल, असं मोदी म्हणाले.