PM Modi in Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार हल्ला बोल केला.  मात्र, सोमवारी लोकसभेतील जवळपास तासाभराच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळातील काही घटनांचा संदर्भ देत तोफ डागली होती. सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा रोख काँग्रेसवर अधिक होता. लोकसभेतील आपल्या जवळपास 60 मिनिटाच्या भाषणात सुमारे 50 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. याचाच अर्थ जवळपास सरासरी प्रत्येक मिनिटाला पंतप्रधानांनी काँग्रेसचा उल्लेख केला. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तपत्राचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा 50 वेळा उल्लेख केला असल्याची माहिती दिली. 


लोकसभेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


काँग्रेस सरकारने 40 वर्षांत गरीबी तर हटवली नाही, पण गरिबांनी काँग्रेसला हटवलं, अशी टीका करत मोदी यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.  मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरु यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, 'ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, त्या काळात नेहरु म्हणाले की, कोरियातील लढाई आपल्या देशावर परिणाम त्यामुळे आपल्या देशातील वस्तूंच्या किंमती वाढतात आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. असं म्हणत देशाच्या पंतप्रधानांनी महागाईची जबाबदारी झटकली होती.


राज्यसभेतही काँग्रेसवर हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत बोलताना सरकारच्या योजना आणि कोरोना काळातील व त्याच्या पश्चात घेतलेले निर्णय, विकासकामांची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणं हेच काँग्रेसचं काम आहे. राष्ट्रीय या शब्दावर काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचं नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक काँग्रेसने सुधारली पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लगावला. 


नेहरूंवरही टीका 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. गोव्याच्या स्वातंत्र्याच्या 60 वर्षांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरदार पटेल यांनी ज्या प्रकारे हैदराबाद, जुनागडसाठी धोरण आखले होते, त्याचप्रमाणे त्यांनी गोव्यासाठी धोरण आखले असते तर त्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली नसती. त्यावेळी भारताच्या पंतप्रधानांना आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची काळजी होती. गोव्यात नागरीक गोळीबारात मृत्यूमुखी पडत असताना नेहरूंनी गोव्यात लष्कर पाठवण्यास नकार दिला होता, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. 


पंतप्रधान मोदी यांनी केले शरद पवारांचे कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. कोणाकडून नाही तर किमान शरद पवार यांच्याकडून तरी शिका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदारांना लगावला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. आजही, राज्यसभेत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाकाळातील घटनाक्रमांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, कोरोना काळात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी काहीजणांकडून या बैठकीवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही पक्षांनी बैठकीला हजर राहू नये असे प्रयत्न करण्यात आले. स्वत: देखील उपस्थित राहिले नाही. मी शरद पवार यांचे पुन्हा आभार मानत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित न राहण्याचा निर्णय युपीएचा नसल्याचे सांगत त्यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी इतरांना सांगितले आणि स्वत: देखील उपस्थित राहिले. शरद पवार यांनी या बैठकीत बहुमूल्य सूचना दिल्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha