पाटणा: आठ वर्षांपूर्वी बिहारची राजधानी पाटणामधील गांधी मैदानात (Gandhi Maidan blast) गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत (Hunkar rally) झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए विशेष कोर्टाने सोमवारी दोषींना शिक्षा सुनावली. कोर्टाने चार दहशतवाद्यांना फाशी शिक्षा ठोठावली आहे. तर, दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अन्य दोघा दोषींना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एका दोषीला सात वर्षांची शिक्षा सुनावली.
आज सकाळी सर्व ९ दहशतवाद्यांना पाटणातील बेउर तुरुंगातून एनआयए विशेष कोर्टात सकाळी नेण्यात आले. याआधी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए विशेष कोर्टाने आरोपी फखरुद्दीन याची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली. हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्दिकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलमसह नऊ जणांना आज एनआयए विशेष कोर्टाने शिक्षा सुनावली. या खटल्यात १८७ जणांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
प्रकरण काय?
पाटणातील गांधी मैदानात हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपाकडून पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याची घोषणा करण्यात आली. या रॅलीशिवाय पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर देखील स्फोट झाला होता. पाटणातील साखळी स्फोटात सहा ठार तर ८० हून अधिकजण जखमी झाले होते.
गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी २७ ऑक्टोबर २०१३ मध्ये पाटणाच्या गांधी मैदान पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी एनआयएने या प्रकरणी तपास सुरू केला आणि एक नोव्हेंबर रोजी दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार नोंदवण्यात आली. यामध्ये अल्पवयीनांसह १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एका आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, अल्पवयीन आरोपींना बाल न्यायलयाने याआधीच तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पाच दोषींना अन्य प्रकरणात याआधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये इम्तियाज, उमेर, अझहर, मोजिबुल्लाह आणि हैदर या दोषींचा समावेश आहे. या दोषींना बौद्धगया साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.