PM Modi Friend Abbas Ali :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास ब्लॉग लिहिला होता. आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी पंतप्रधानांनी ब्लॉगच्या माध्यमातून काही आठवणी शेअर केल्या होत्या. त्यात पंतप्रधान मोदी यांचे बालपणीचे मुस्लिम मित्र अब्बास याच्याबद्दलच्या आठवणींनाही उजाळा दिला होता. वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला, अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले असं पंतप्रधानांनी ब्लॉगच्या माध्यमातून म्हटलं होतं. 


पंतप्रधानांच्या या ब्लॉगनंतर अब्बास नेमके कोण आहेत यावरुन सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली. आता मोदींनी उल्लेख केलेले अब्बास अली हे सध्या सिडनीमध्ये राहतात. अब्बास अली यांच्याशी एबीपी न्यूजनं बातचीत केली आहे. त्यांनी म्हटलं की, मोदी यांच्या घरी ते एक वर्ष राहिले. तिथूनच मॅट्रिकची परीक्षा दिली. 


अब्बास यांनी म्हटलं की,  त्यांचे वडील आणि मोदींच्या वडिलांची मैत्री होती.  4 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्ष ते पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांच्या घरी राहिले. मोदींच्या वडिलांनीच अब्बास यांना आपल्या घरी आणलं होतं. तिथूनच ते मॅट्रिक पास झाले. 


अब्बास म्हणाले की, आम्ही त्यावेळी होळी, दिवाळी, ईद एकत्र साजरी करायचो. मोदी यांच्या मातोश्री ईदवेळी सेवई बनवायच्या. आज जसं वातावरण आहे तसं आधी नव्हतं. होळी, दिवाळी एकत्र सेलिब्रेट करायचो. 


 
अब्बास यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही. अहमदाबाद मध्ये राहत असून कधी भेटलो नाहीत. मोदी यांच्याशी कमीत कमी भेट झाली, असं ते म्हणाले.


ब्लॉगमध्ये पंतप्रधान अब्बास यांच्याबद्दल काय म्हणाले....
आईला इतर लोकांच्या आनंदात आनंद मिळत असे आणि ती खूप मोठ्या मनाची होती असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले होते. “वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला, अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. आई आम्हा सर्व भावंडांप्रमाणेच अब्बासची प्रेमाने काळजी घ्यायची. दरवर्षी ईदच्या दिवशी ती त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे याची आठवण त्यांनी सांगितली. सणासुदीला, आजूबाजूची मुले आमच्या घरी यायचे आणि आईच्या हातच्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायचे असेही त्यांनी नमूद केले ."