नवी दिल्ली : प्रशासनासमोरील आव्हानं पूर्वीपेक्षा वाढली आहेत. त्यामुळे आता कामाचं स्वरुप बदलून आव्हानांचं संधीत रुपांतर करावं लागणार आहे, असं अावाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले.
राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनाचं निमित्त साधत प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सन्मान केला गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना यावेळी प्रोत्साहन दिले गेले.
“सध्या स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे आव्हानंही प्रचंड आहेत. गेल्या 20 वर्षात अनेक बदल झाले आहेत. मात्र, यंदा गुणात्मक बदल होणं गरजेचं आहे.”, असे पंतप्रधान मोदींनी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्देशून सांगितले. शिवाय, “नागरी सेवेत अत्यंत बुद्धिमान आणि हुशार लोक येतात, त्यामुळे कामही त्याच प्रकारे व्हायला हवं.”
सुधारणांबाबत सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती अजिबात कमी नाही. त्यामुळे काहीतरी हटके विचार करा, असं आवाहनही मोदींनी यावेळी केले.
राजकीय इच्छाशक्ती केवळ सुधारणा आणू शकते. मात्र, प्रशासनाचं काम आणि जनतेचा सहभागच खरा बदल करु शकतो. त्यामुळे आपल्याला या सर्वांना एकत्र आणावं लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.