नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या 72व्या वर्षाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकारच्या कामाजा लेखाजोखा दिला. यावेळी आपण केलेल्या कामांची माहिती देताना मोदींनी यूपीए-2चं शेवटचं वर्ष- 2013शी तुलना केली.


"2013च्या गतीने आम्ही काम केलं असतं तर जी कामं आम्ही चार वर्षात केली ती कामं करायला शंभर वर्ष लागली असती", असं मोदींनी सांगितलं. शौचालय, वीज आणि गॅस कनेक्शन सारख्या मुलभूत सुविधांचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला.


2013 विरुद्ध 2018
आपल्या साडेचार वर्षाच्या कामगिरीची माहिती देताना मोदी म्हणाले की, "आपण पुढे जात आहोत हे तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपण कुठून सुरूवात केली यावर नजर टाकत नाही. आपण कुठून सुरूवात केली यावर नजर टाकली नाही तर आपण कुठपर्यंत पोहोचलो याचा अंदाज येत नाही."


2013च्या यूपीए-2 सरकारच्या कामाच्या वेगावर नजर टाकली आणि आज सरकारच्या कामाच्या वेगावर नजर टाकली, तर देश किती झपाट्यानं प्रगती करत आहे हे समजेल. 2013च्या गतीने देशात शौचालय बांधण्याचं काम झालं असतं तर, हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक दशकं लागली असती.


गावात वीज पोहोचण्याच्या कामांचा 2013च्या गतीचा विचार केला, तर देशातील गावांमध्ये वीज पोहोचण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागली असती, असं मोदी म्हणाले.


एलपीजी गॅस कनेक्शनबाबत बोलायचं तर 2013च्या गतीनं हे काम झालं असतं तर, हे काम पूर्ण होण्यासाठी 100 वर्ष लागली असती. तसेच 2013च्या गतीने देशातील ऑप्टिकल फायबरचं जाळं पसरवण्याचं काम झालं असतं तर, यासाठी अनेक पिढ्यांना वाट पाहावी लागली असती, असा टोला मोदींनी लगावला.


देशातील जनतेच्या आशा, अपेक्षा जास्त आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आज आम्ही केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करत आहोत, हेच कारण आहे की देशाचा विकास झपाट्यानं होत आहे.


सरकारी कार्यालयं तीच आहेत, फाईल त्याच आहेत, निर्णय प्रक्रिया करणारे लोक तेच आहेत. मात्र चार वर्षात देशात बदल दिसून येत आहे, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.


संबंधित बातम्या


गरीब कुटुंबासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'ची घोषणा


स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे


नेहरु, मनमोहन, वाजपेयी ते मोदी, लाल किल्ल्यावर कुणाचं किती मिनिटे भाषण?


2022पर्यंत अंतराळात तिरंगा फडकणार- मोदी