नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज विरोधी आघाडीच्या नव्या नावावर हल्लाबोल केलाय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरून मोठा संग्राम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल केलाय. केवळ "इंडिया" नाव ठेवल्यानं काही फरक पडणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही "इंडिया" नाव लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही "इंडिया" आहे. तसंच विरोधक विखुरलेले आहेत आणि हताश झाले आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाहीये, असं त्यांचा दृष्टिकोन पाहून दिसतंय. असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय.


बंगळुरूमध्ये 18 आणि 19 जुलैला झालेल्या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव जाहीर केलं. INDIAN NATIONAL DEMOCRATIC INCLUSIVE ALLIANCE अर्थात INDIA. एकप्रकारे भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर म्हणूनच विरोधकांनी आपल्या नावात इंडिया आणलं अशी चर्चा होती. त्याला भाजप कसं उत्तर देणार याची उत्सुकता असतानाच आज मोदींनी त्याला इंडियन मुजाहिद्दीन ईस्ट इंडियाचा ट्विस्ट दिलाय. त्यावर राहुल गांधींनी म्हटलं आहे.


काय आहे रणनीती?


 काँग्रेसप्रणित आघाडीचं नाव यूपीए होतं. पण आता देशात काँग्रेसच खिळखिळी झाल्यानं त्यांच्या नेतृत्वाचा शिक्का अनेक विरोधी पक्षांना नको. त्याचमुळे आघाडीसाठी नवं नाव शोधलं गेलं. आघाडीच्या नावासाठी सुरुवातीला भारत जोडो अलायन्स याही नावाचा विचार सुरु होता. पण नंतर इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स अर्थात इंडियावर शिक्कामोर्तब झालं. हे नाव देण्यापाठीमागं काय रणनीती आहे असं विचारल्यावर आघाडीच्या एका नेत्याचं उत्तर होतं. मोदींविरोधात कोण हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो, असं विचारल्यावर आता आमचं उत्तर असेल इंडिया. 


पंतप्रधान मोदींनी केला पहिला पलटवार


ज्या दिवशी विरोधकांचं हे आघाडीचं नामकरण होत होतं, त्याच दिवशी इकडे दिल्लीत एनडीएच्या बैठकीनिमित्त भाजपचही मित्रपरिवाराचं शक्तीप्रदर्शन सुरु होतं. बंगळुरुत 26 तर दिल्लीत 38 पक्ष असल्याचा दावा केला गेला होता. एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढाई 2024 ला रंगणार असं चित्र लगेच रंगवलं गेलं. पंतप्रधान मोदींनी आता पहिला पलटवार केलाय..विरोधक नैराश्यनं घेरलेले आहेत. दिशा हरवलेले आहेत असं म्हणत त्यांनी आज हल्लाबोल केलाय. नावात काय आहे असं शेक्सपियरनं कितीही म्हटलं तरी हेच नाव सध्या राजकीय लढाईला मात्र कारणीभूत ठरतंय.