पणजी: गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पणजीमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी अस्थिरतेमुळे गोवा आजारी असल्याचं मोदी म्हणालं. तसेच मतांची विभागणी करणारे लोकशाहीचे खिसेकापू असल्याची टीका मोदींनी यावेळी केली आहे.
काँग्रेसला लक्ष्य करुन पंतप्रधान म्हणाले की, काही राजकीय पक्ष विकासापेक्षा प्रतिस्पर्ध्यांचं जास्तीत जास्त नुकसान कसं होईल, यावर भर देतात. पण देशातील जनता बुद्धिमान आहे. त्यामुळे ते भाजपला मतदान करुन विजयी करतील असा विश्वासही व्यक्त केला.
विरोधकांकडून अर्थ संकल्पाच्या तारखेचा मुद्दा केल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, ''अर्थ संकल्पाच्या तारखेचा मुद्दा करुन काहीजण आपली शक्तीपणाला लावत आहेत. पण तितकी मेहनत त्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यासाठीही अर्थमंत्र्यांना करायला हवी होती,'' असा टोला लगावला.
पंतप्रधानांनी यावेळी बोलताना आम आदमी पक्षावरही जोरदार हल्ला चढवला. पक्षाचे नाव न घेता ते म्हणाले की, ''दोन्ही राज्यात एकाच दिवशी मतदान व्हावे, यासाठी एका राजकीय पक्षाने पंतप्रधान कार्यालयाने निवडणूक आयोगावर दबाव आणल्याची टीका केली. पण, आपल्या व्यवस्थांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांना अधिकच बळकट केलं पाहिजे. पण काही लोक त्यांना कमजोर करण्यातच धन्यता मानत आहेत,''
केंद्र सरकारकडून गोव्याला देण्यात आलेल्या विकास निधीबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले की, ''गेल्या 25 महिन्यात केंद्र सरकारने गोव्याला जितके दिले, तितके गेल्या 50 वर्षातील केंद्राने दिले नसेल. व्हिसासंदर्भात देण्यात आलेल्या सवलतींचे गोवा सर्वाधिक लाभार्थी राज्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गोव्यात 4 फेब्रुवारीला निवडणुका होणार असून, आतापर्यंत भाजप 36 उमेदवारांची घोषणा केली आहे. गोवा आणि पंजाबमध्ये एकाच दिवशी मतदान होत असल्याने राजकीय पक्षांनी याचा मुद्दा बनवला आहे.