नवी दिल्ली : भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी त्याची पाळेमुळं खणून काढली जाऊ शकतात असा विश्वास देशातील जनतेमध्ये गेल्या सहा-सात वर्षात निर्माण झाला आहे, भ्रष्टाचार संपूर्णपणे नष्ट करण्याची राजकीय इच्छाशक्ती आताच्या सरकारमध्ये असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सीबीआय आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन (CVC) च्या संयुक्त परिषदेत बोलत होते. 


गेल्या दशकानुदशके सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या सवयींना संपवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा सर्वोत्तम उपाय असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. हा नवा भारत आहे, या नव्या भारतात भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भ्रष्टाचार छोटा असो वा मोठा, त्यामुळे कुणाच्या ना कुणाच्या अधिकारांवर गदा येते. भ्रष्टाचारामुळे देशातील नागरिकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित रहावं लागतं. तसंच त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये बाधा येते. या सर्व गोष्टीमुळे देशाची सामूहिक शक्ती प्रभावित होते." 


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "देशातील भ्रष्टाचार कितीही मोठा असो, त्यामागे कितीही मोठी शक्ती असो, आपलं सरकार त्याला सोडणार नाही. गेल्या सहा-सात वर्षामध्ये देशातील जनतेमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे की आताचं सरकार भ्रष्टाचाराला थारा देत नाही. या विश्वासाच्या आधारे सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग बंद केले आहेत. या नव्या भारतात भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा भाग होऊ शकत नाही. नव्या भारतात व्यवस्था ही पारदर्शक असावी, परिणामकारक असावी आणि सुलभ असावी."
 
महत्वाच्या बातम्या :