नवी दिल्ली : देशाच्या कोरोना विरोधातल्या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 99 कोटीहून अधिक डोस देण्यात आले असून आज ऐतिहासिक 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 100 कोटी लसींचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुद्धा केली आहे. 


देशात 16 जानेवारीला कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारीला एक कोटी डोस देण्यात आले. 15 जून रोजी 25 कोटी डोस पूर्ण झाले तर 6 ऑगस्ट रोजी 50 कोटी डोस पूर्ण झाले. त्यानंतर 13 सप्टेंबरला 75 कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाला तर मंगळवारी, 19 ऑक्टोबरला 99 कोटीहून अधिक लोकांना डोस देण्यात आले आहेत. 


देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केलं जाणार आहे. लसीकरणाने 100 कोटींचा आकडा ओलांडताच हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसं की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे.


या थीम साँगबद्दल बोलताना गायक कैलास खेर म्हणाले की, "लसीबाबत देशातील अनेक नागरिकांमध्ये अजूनही निरक्षरता आणि चुकीची माहिती आहे. या थीम साँगच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल."


देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची संख्या ही 39 कोटी 58 लाख 41 हजार इतकी आहे तर 45 ते 60 वयोगटातील नागरिकांची संख्या ही 16 कोटी 84 लाख 48 हजार इतकी आहे. 60 वर्षावरील नागरिकांची संख्या ही 10 कोटी 60 लाख इतकी आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ही एक कोटी तीन लाख इतकी आहे तर फ्रन्ट लाईन वर्कर्सची संख्या ही एक कोटी 83 लाख इतकी आहे. 


संबंधित बातम्या :