Parliament Monsoon Sessionसंसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा काळ खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या 25 वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे आहेत. 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सभागृहाचे सर्व सदस्य देशात नवी उर्जा भरण्यासाठी मदत करतील. हे अधिवेशन यासाठी महत्वाचं आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे, असं ते म्हणाले.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  आम्ही नेहमी सभागृहाला संवादाचं सक्षम माध्यम मानतो, तीर्थक्षेत्र मानतो, जिथं खुल्या मनानं संवाद होतात. गरज पडल्यास वादविवाद व्हायला पाहिजे. विश्लेषण झालं पाहिजे. कारण धोरणं आणि निर्णयात सकारात्मकता येते. माझं सर्व सदस्यांना आवाहन आहे की गहन चर्चा व्हाव्यात. उत्तम चर्चा आवश्यक आहेत. यासाठी सर्वांचं सहकार्य हवं. सर्वांच्या प्रयत्नानं सभागृह चालतं. त्यानं चांगले निर्णय सदनात होता. त्यामुळं सदनाची गरिमा वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रहितासाठी आपण सभागृहाचा वापर करावा, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 
 
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचा विकास जलद गतीने होत आहे. सदनाचा सर्वाधिक सकारात्मक वापर होऊन देशासाठी उपयोगी काम होईल, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. 


 पावसाळी अधिवेशनात 24 विधेयकं मांडली जाणार


या पावसाळी अधिवेशनात एकूण 18 बैठका होणार असून 24 विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं रविवारी 17 जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत (All Party Meeting)  विरोधी पक्षांनी सुमारे 25 मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी (PM Modi) गैरहजर होते या मुद्द्यावरुन काँग्रेसनं भाजपला घेरत, खिल्ली उडवली आणि काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं होतं.


12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपती (Presidential Election) आणि उपराष्ट्रपती (Vice Presidential Election) या दोन्ही महत्त्वाच्या घटनात्मक पदांसाठीही निवडणुका होणार आहेत.