लखनऊ: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर रेनकोटबाबतच्या वक्तव्यावरुन हल्ला चढवला.


"पंतप्रधानांना केवळ जन्मकुंडल्या वाचणं, गुगलवर सर्च करणं आणि लोकांच्या बाथरुममध्ये डोकावणं, याचीच आवड आहे", असा घणाघात राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, यूपीसाठीचा दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला.

या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे गेल्या अडीच वर्षात सपशेल अपयशी ठरलं आहे. नोटाबंदी, काळापैसा, नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये असे वादे मोदींनी केले. मात्र कोणतंही ठोस काम करण्यात मोदी अपयशी ठरले"

लोकांच्या बाथरुममध्ये डोकावण्याची आवड मोदींना आहे, असं टीकास्त्र राहुल गांधींनी सोडलं.

https://twitter.com/ANINewsUP/status/830282793141755904

मोदींचं रेनकोटबाबतचं वक्तव्य

राज्यसभेत मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

"स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जवळपास 35 वर्षे देशाची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ कशी करावी, ते मनमोहन सिंहांकडून शिकावं", असं मोदी राज्यसभेत म्हणाले होते.

त्यावरुन मोठा वादंग झाला होता. काँग्रेस खासदारांनी राज्यसभेतून वॉकआऊट करत, मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

यूपीसाठी सपा-काँग्रेसचा 10 कलमी कार्यक्रम

दरम्यान, अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी यूपीच्या नागरिकांवर घोषणांचा पाऊस पाडला. तरुणांना मोफत स्मार्टफोन, 20 लाख तरुणांना कौशल विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराची हमी दिली.

त्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जात सूट देत स्वस्त वीज आणि शेतमालाला योग्य भाव देण्याचं आश्वासन देण्यात आलं.

संबंधित बातमी

बाथरुममध्ये रेनकोट घालणं मनमोहन सिंहांकडून शिका : मोदी