नवी दिल्ली : 'तुमच्या घरातील किंवा परिसरातील कोणी उघड्यावर शौचाला जातं का?' हा प्रश्न तुम्हाला फोन करुन साक्षात बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनने विचारला तर? असं झालं तर आश्चर्यचकित होऊ नका! हागणदारीमुक्तीसाठी सरकार नव्या योजनेच्या तयारीत आहे.
देशभरातील गावं हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारनं आता नवं पाऊल उचललं आहे. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणारा अमिताभ आता फोनकॉलद्वारेही जनजागृती करणार आहे. हागणदारीमुक्त झालेली गावं अजूनही तशीच स्वच्छ आहेत का, हे जाणून घेण्यासाठी पुढील 10 दिवसांमध्ये अमिताभच्या आवाजात रेकॉर्ड केलेले कॉल अशा काही गावांमध्ये लावले जाणार आहेत.
यावेळी अमिताभ बच्चन दोन प्रश्न विचारणार आहेत. तुमच्या कुटुंबातील किंवा गावातील कोणी उघड्यावर शौचाला जातं का? यासारख्या प्रश्नांचा यात समावेश असेल. 50 हजार जणांना फोन करुन हे प्रश्न विचारण्याचं उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत 91 जिल्हे आणि 1 लाख 58 हजार गावं हागणदारीमुक्त झाल्याची नोंद आहे. मात्र ही परिस्थिती कायम आहे का, हे तपासण्यासाठी पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.