लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे 75 हजार कोटी रुपयांच्या 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशातील 1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेचा पहिल्या हप्त्याच्या रुपात 2 हजार रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गोरखपूरमध्ये या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. योजनेबद्दल विरोधक अफवा पसरवत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वान न ठेवण्य़ाचं आवाहन मोदींनी केलाय.

1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने 2019-20 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'ची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या 12 कोटी छोटय़ा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हप्त्यांमध्ये वर्षांला सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी पहिला हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

VIDEO | प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींचं कुंभमेळ्यात स्नान | उत्तर प्रदेश | एबीपी माझा



किसान सन्मान निधी योजना चालू आर्थिक वर्षापासून अंमलात आणण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता मार्चपूर्वीच मिळणार आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह 14 राज्यांमधील शेतकऱ्यांना रविवारी पहिला हप्ता मिळणार आहे.